गोव्यातील राजकीय समस्येवर शनिवारी तोडगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे दिल्ली येथील एम्समधून उपचार घेऊन परत येईपर्यंत राज्यकारभार कसा चालवायचा यावर शनिवारी तोडगा निघण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा शुक्रवारी रात्री उशिरा राजस्थानमधून दिल्ली येथे परतणार आहेत. त्यामुळे उद्या किंवा परवा गोव्याबाबतचा निर्णय ते जाहीर करतील अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे.

गोव्यातील नव्या नेतृत्वाबद्दल अद्याप निर्णय नाही! भाजप खासदारांची माहिती

दरम्यान शुक्रवारी काँग्रेसच्या 16 आमदारांनी विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांच्यावर अविश्वास व्यक्त करत त्यांना पदावरुन हटवले जावे अशा आशयाची मागणी करणारे पत्र विधानसभा सचिवांकडे सादर केले आहे. पत्रात सावंत यांना का हटवावे याचे कोणतेच कारण देण्यात आलेले नाही. सध्या अधिवेशन देखील सुरु नसल्याने या मागणीची कितपत दखल घेतली जाईल हा प्रश्न आहे.

काँग्रेस आमदारांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले, ‘काँग्रेसने कितीही खटाटोप केले तरी त्यांना 21 चा आकडा गाठता येणार नाही. भाजप आघाडीचे आमदार एकसंध असल्याने आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. आम्ही कोणत्याही क्षणी बहुमत सिद्ध करू शकतो हे काँग्रेसने लक्षात ठेवावे.’

काँग्रेसने राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे. राज्यपालांकडून त्यावर कोणते उत्तर काँग्रेसला मिळालेले नाही. राज्यपालांचे उत्तर काय येते याची प्रतिक्षा काँग्रेस नेते करत आहेत. काँग्रेसचे दोन आमदार जेनिफर मोन्सेरात आणि फिलिप नेरी रॉड्रिग्ज विदेशात गेले असले तरी गरज पडली तर 24 तासांच्या आत ते गोव्यात पोचतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कळवले आहे. दोन्ही आमदार पक्षाला कल्पना देऊनच विदेश दौऱ्यावर गेल्याचे काँग्रेसने कळवले आहे.

पर्रिकर यांच्या आजारपणामुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अमित शहा कोणता तोडगा काढून गोव्यातील राजकीय समस्येवर तोडगा काढतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.