
सामना ऑनलाईन, ठाणे
चोरांच्या भीतीमुळे हल्ली नागरिक सतर्क झाले आहेत. अनोळखी व्यक्ती दिसल्यास ते दारही उघडत नाही. नागरिक सतर्क झाल्याचं लक्षात आल्याने आता चोरांनी कुरियर बॉय, पार्सल घरपोच करणारे, पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनूनन घरात घुसायला सुरुवात केली आहे. ठाण्यातील लुईसवाडीमध्ये असाच प्रकार घडल आहे. कुरियर देण्याच्या बहाण्याने तीन चोर घरात घुसले आणि त्यांनी 3 लाखांची लूट केली.
सकाळी आठच्या सुमारास ५० वर्षांची गृहिणी आणि तिचा २० वर्षांचा मुलगा असे दोघेच जण घरात होते. दाराची बेल वाजल्याने महिलेने दरवाजा उघडला. कुरियर बॉय असल्याचं सांगत दारात उभ्या असलेला माणूस बॉक्स ठेवण्याचा बहाणा करत घरात घुसला. कुरियर मिळाल्याच्या कागदावर सही करत असताना घरात आणखी एक माणूस घुसला आणि त्याने मुलाला चाकूचा धाक दाखवला, तितक्यात तिसरा चोरही घरात घुसला आणि त्याने महिलेच्या तोंडात बोळा कोंबला आणि तिला मारहाण केली. तिच्या मुलालाही मारहाण केली आणि महिलेकडून चाव्या घेत तिजोरी उघडून रोख रक्कम आणि दागिने घेऊन चोर फरार झाले. या घटनेचा तपास वागळे इस्टेट पोलीस करीत आहेत.


























































