
महेश पवार, सातारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांची शनिवारी साताऱ्यामध्ये भेट झाली. दोघांमध्ये एकांतात झालेल्या चर्चेचा पूर्ण तपशील कळू शकलेला नाही. चर्चा संपल्यानंतर बाहेर पडलेल्या उदयनराजेंना जेव्हा पत्रकारांनी चर्चेबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले की मी म्हटलं की ‘फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आपल्याला पण कळतं’ हे वाक्य इथेच थांबवत ते तिथून निघून गेले.
चर्चा संपल्यानंतर जेव्हा उदयनराजे बाहेर पडले तेव्हा गाड्या सारख्या असल्याने ते चुकून शरद पवार यांच्या गाडीत बसणार होते, मात्र चालक वेगळा असल्याचं दिसताच त्यांना कळालं की ही गाडी आपली नाही, त्यामुळे ते तिथून पुढे निघत त्यांच्या स्वत:च्या गाडीत जाऊन बसले. शरद पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. उदयनराजे पक्षावर नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार यांनी त्यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातंय. यापूर्वीही जेव्हा शरद पवार जेव्हा सातारा दौऱ्यावर आले होते, तेव्हा उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.



























































