ओडिशाला फटका दिल्यानंतर डेई वादळ पुढे सरकले ; आठ राज्यांत अॅलर्ट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

बंगालच्या उपसागराहून आलेल्या डेई चक्रीवादळाने ओडिशाला तडाखा दिला असून आता ते वादळ इतर राज्यात पुढे सरकत आहे. ओडिशात थैमान घातलेल्या वादळामुळे देशातील वातावरणात बदल होत असून आठ राज्यांना अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशासह तेलंगणा, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागात अजूनही वादळी वारे वाहत असून जोरदार पाऊस पडत आहे. या वादळामुळे महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, मध्ये प्रदेशच्या काही भागात पाऊस पडत आहे.

वादळामुळे ओडिशाला मोठा फटका बसला असून अजूनही तेथे वादळी वारे वाहत आहे. राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने भूस्खलनाच्या घटना घडल्या असून मलकानगिरी जिल्ह्याला वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील काही भागात पाणी साचले आहे. विविध ठिकाणी अडकलेल्या 150 लोकांनी सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशाच्या कोरापूटमध्ये 100 मिमी तर बालासोरमध्ये 141 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

वादळामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणही बदलले आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह देशातील अनेक भागात वादळामुळे पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह आठ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.