शिक्षकांच्या पगाराला उशीर का होतोय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । मुंबई

शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शिक्षकांचे पगार आणि इतर भत्ते वेळेत शाळेच्या बँक खात्यात जमा होत आहेत. तरीदेखील शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हातात उशिराने पगार पडतो. त्यामुळे आता यामागची कारणे शोधण्याचे काम शिक्षण विभाग करणार आहे. शिक्षण विभागाने शाळेच्या मूळ खात्यात पगाराचे पैसे जमा झाल्यानंतर ते बँकेद्वारे शिक्षकांच्या वैयक्तिक खात्यात कधी जमा होतात याचा जानेवारी 2018 पासूनचा तपशील मागविला आहे. शिक्षकांचे पगार वेळेत अदा करण्यासाठी शिक्षण विभागाने इलेक्ट्रॉनिक्स निधी वितरण प्रणाली (ईसीएस, ईएफटी, एनईएफटी) आणली. या प्रणालीद्वारे शाळांमधील शिक्षकांच्या पगाराची रक्कम शाळेच्या मूळ बँक खात्यात जमी केली जाते. सदर रक्कम जमा झाल्यानंतर बँकेद्वारे शिक्षकांच्या वैयक्तिक खात्यात पगार जमा केला जातो, मात्र या कामातही उशीर होत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. मुंबई मुख्याध्यापक संघटनेने शिक्षकांचे पगार उशिरा होण्याची कारणे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणली होती. त्यानुसार विभागाने ही कार्यवाही केली असल्याचे संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.