
सामना प्रतिनिधी । पुणे
गणपती विसर्जनात डॉल्बी-डीजेला परवानगी नाकारल्यानंतर देखील डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला आहे. पुण्यात अजूनही गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असून बाजीराव रोडवर डीजेचा दणदणाट सुरूच आहे. ध्वनि प्रदूषणाचे कारण देत उच्च न्यायालयाने डॉब्ली-डीजेला परवानगी नाकारली होती. तसेच राज्य सरकारने देखील डॉल्बी-डीजेला विरोध असल्याचं न्यायालयात स्पष्ट केलं होतं. मात्र या सगळ्याला केराची टोपली दाखवत मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सुरूच आहे.
पुण्यात गणपती विसर्जन दरवर्षी जोशात, जल्लोशात होते. यंदा डॉल्बी-डीजे यांच्यावर बंदी असल्याने दणदणाट नसणार असे चित्र होते. मात्र ही बंदी झुगारून पुण्यातील अनेक मंडळांनी बिनधास्त डॉल्बी-डीजे सुरू ठेवले. रविवारी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस वसाहत मित्रमंडळाने देखील विसर्जन मिरवणुकीमध्ये मिक्सर आणि थप्पी लावली होती. पुण्यात अजूनही गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असून डीजेचा दणदणाट सुरूच आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून डीजे वाजवणाऱ्या पुण्यातील 30 गणेश मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. अजूनही काही मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली आहे.
























































