
सामना ऑनलाईन । बीजिंग
अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे या दोन देशांमधील तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवर प्रतिबंध लगावल्यानंतर चीनने अमेरिकेच्या राजदुतांना गेल्या आठवड्यामध्ये समन्स दिले होते. आता चीनने आणखी एक मोठा निर्णय घेत अमेरिकेसोबत होणारा संयुक्त सैन्य अभ्यास रद्द केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्र जारी करून ही माहिती दिली आहे. चीन आणि अमेरिकेतील तणावाचा परिणाम जागतिक स्तरावर दिसत असून या दोन्ही देशांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
संयुक्त सैन्य अभ्यास रद्द केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रामध्ये म्हटले की, चीनने नौदलाचे प्रमुख शिन जिनलांग यांना अमेरिकेच्या दौऱ्यावरून परत बोलावण्यात आले आहे. पुढील आठवड्यात चीन आणि अमेरिकेत होणारी वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांची चर्चा सध्या रद्द करण्यात आली आहे. तसेच कोणतीही अधिक माहिती आणि सूचना न देता चर्चा रद्द करण्याचा अधिकार चिनी सैन्याकडे आहे असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हे पत्र जारी करताना चीनच्या सैन्य मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, रशियाकडून फायटर जेट आणि मिसाईल सिस्टिम खरेदी करण्याचा चीनचा निर्णय सामान्य आहे. दोन संपन्ना राष्ट्रांमध्ये झालेल्या या निर्णयवार प्रश्न उपस्थित करण्याचे काहीही कारण नाही. अमेरिकेला या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.























































