सामना ऑनलाईन । भोपाळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये भाजपच्या कार्यकर्ता महाकुंभ मेळाव्यात काँग्रेसवर कडाडून टीका केली. काँग्रेस पक्ष देशभरात अनेक प्रादेशिक पक्षांशी युती करत आहे. पण ही युती देशाच्या भल्यासाठी नसून निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने करण्यात येत आहे. मात्र, देशभरात त्यांची युती-आघाडी यशस्वी होत नसल्याने देशाबाहेर युती करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदींनी या मेळाव्यात केला. हिंदुस्थानचा पंतप्रधान कोण होणार हे आता इतर देश ठरवणार काय असा सवाल करत मोदी यांनी काँग्रेस पक्षाची सध्या दयनीय अवस्था झाल्याचे सांगितले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे मानसीक संतुलन बिघडल्याची टीकाही त्यांनी केली.
Yeh party Hindustan mein gathbandhan karne mein safal nahi ho rahi hai isliye Bharat ke bahar gathbandhan khoja ja raha hai. Duniya ke desh ab tay karenge ki Bharat mein PM kaun hoga?Congress party kya haal ho gaya hai aapka?Kya satta khone ke baad aapne santulan bhi kho diya?:PM pic.twitter.com/EddKM81TLR
— ANI (@ANI) September 25, 2018
देशात भाजपची राज्य सरकारे यशस्वी झाली नसती तर काँग्रेस प्रादेशिक पक्षांशी युती, आघाडी करण्यासाठी कधीही पुढे आली नसती. काँग्रेसला खूप अंहकार असून त्यांनी प्रादेशिक पक्षांचे अस्तीत्वच संपवले असते, असा आरोपही मोदी यांनी केला. मात्र, पराभवाच्या भीतीने सव्वाशे वर्षांची काँग्रेस आज लहान पक्षांची मनधरणी करत आहे. ज्या पक्षाने देशावर साठ वर्षे राज्य केले. त्या पक्षाला आज सूक्ष्मदर्शक घेऊन शोधावे लागत आहे. काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेसने अंहकार सोडून आत्मचिंतन केले असते तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती. संसदेत 440 सदस्य असलेल्या काँग्रेसची सदस्यसंख्या 44 झाली, तरीही काँग्रेस आत्मचिंतन करायला तयार नाही. त्यांच्यात अंहकार आणि घराणेशाही आहे, अशी टीकाही मोदी यांनी केली. शब्दकोशात अशी कोणतीही शिवी नसेल की जी काँग्रेसने माझ्यासाठी वापरली नाही. जेव्हा कधी संधी मिळाली तेव्हा त्यांनी चिखलफेक केली. मात्र, जनतेने त्यांना नाकारून भाजपला स्वीकारले आहे. जनतेच्या आशीर्वादाने भाजपला असेच यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

























































