
सामना ऑनलाईन । पुणे
क्रिकेट हा मैदानात कर्णधाराच्या व्यूहरचनेने यश मिळवण्याचा खेळ आहे. संघप्रशिक्षकांनी पॅव्हेलिअनमध्ये खुर्चीवर बसून आरामात खेळाचा आनंद लुटावा. आपणच संघाच्या यशाचे मानकरी आहोत या भ्रमात राहू नये ,अशी टीका टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने हिंदुस्थानी संघ प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली आहे. काही क्रिकेट प्रशिक्षक स्वतः फुटबॉल प्रशिक्षक असल्याच्या तोऱ्यात वावरून संघाच्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्यात धन्यता मानत आहेत. पण दोन्ही खेळात जमीन-अस्मानाचा फरक आहे ,असे स्पष्ट करून गांगुली म्हणाला ,क्रिकेट हा प्रामुख्याने मैदानात कर्णधाराच्या व्यूहरचनेचा खेळ आहे .कर्णधार चुकला तर त्याचा फटका संघाला बसतो. संघ प्रशिक्षकांनी मैदानाबाहेरचे व्यवस्थापन सांभाळायचे असते. लढतीच्या वेळेस मात्र त्यांनी खुर्चीत बसून खेळाचा आनंद घेतलेला बरा असे माझे स्पष्ट मत आहे, असे तो म्हणाला.
क्रिकेट प्रशिक्षकपदासाठी ‘व्यक्ती व्यवस्थापन’ कौशल्य महत्त्वाचे आहे आणि फार कमी लोकांमध्ये ते दिसते, असे सांगून गांगुलीने रवी शास्त्री यांना क्रिकेटचा अंतिम संघ कोण निवडतो, रोहित शर्मा की रवी शास्त्री?’ असा सवाल केला. कर्णधार आणि प्रशिक्षक या दोघांनीही आपल्या जबाबदारीची योग्य जाणीव ठेवली तर संघाला यश मिळतेच. आतापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी प्रवासातून हेच दिसून आलेच आहे, असेही गांगुलीने स्पष्ट केले.
क्रिकेट आणि फुटबॉल यांच्या व्यूहरचनेत बराच फरक आहे. फुटबॉल प्रशिक्षकांप्रमाणे आपण क्रिकेट संघ चालवत असल्याचा गैरसमज सध्याच्या प्रशिक्षकांमध्ये वाढलेला आहे. क्रिकेट हा कर्णधाराचा खेळ आहे आणि प्रशिक्षकांची भूमिका पडद्यामागची आहे. याची जाण त्यांना करून देणे महत्त्वाचे आहे.
– सौरभ गांगुली ,माजी कर्णधार


























































