
सामना ऑनलाईन । मुंबई
सिनेमाध्यमाच्या रूढ चौकटी भेदण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट मराठीत अगदी क्वचित आढळतात. चाकोरीबाहेरचा दृष्टीकोन ठेवत वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्यांच्या यादीत आता दिग्दर्शक विश्वास जोशी यांच्या ‘घे डब्बल’ या आगामी मराठी चित्रपटाची भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर, नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत गणरायाच्याचरणी या चित्रपटाच्या लेखनाची प्रत ठेवण्यात आली. साऱ्यांच्या शुभेच्छा आणि गणरायाचा कृपाशीर्वाद या चित्रपटाला लाभेल, असा विश्वास यावेळी दिग्दर्शक विश्वास जोशी व्यक्त केला. शेक्सपियरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या जगप्रसिद्ध नाटकाच्या प्रेरणेने ‘घे डब्बल’ चित्रपटाचे लेखन हृषीकेश कोळी व विश्वास जोशी यांनी केले आहे. यामध्ये दोन हिरोंचे डबल रोल प्रेक्षकांना पाहायला मिळतील. चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अजून गुलदस्त्यात आहेत, मात्र पुढच्या वर्षी रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट लवकरच सज्ज होईल, असे जोशी यांचे म्हणणे आहे.























































