
सामना ऑनाईन । नंदुरबार
नंदुरबार शहरात जादुटोण्याचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पैशाचा पाऊस पाडण्यासाठी आणि चांगली बायको मिळावी म्हणून अघोरी पुजेचा प्रकार करण्यात आला आहे . शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या अघोरी पुजेसाठी फूस लाऊन पाच युवकांना बोलवल्याने नरबळी देण्याचा प्रकार होता का असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुजेचे साहित्य जप्त करून दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास कुरु आहे.
नंदुरबारमधील गजबजलेल्या जलका बाजार परिसरातील एका घरात चार दिवसांपासून अघोरी पुजेचा प्रकार सुरु होता. पुजेसाठी पाच युवकांना एका घरात आणून तिथे त्यांचे चहापान केल्यानंतर त्यांच्यासोबत काय केले जात होते हे त्यांना कळतच नव्हते. मात्र यातील एका पिडीताने आपल्याला विवस्त्र करुन पुजा केल्याचे घरच्यांना सांगीतल्यानंतर या अघोरी प्रकारचे बिंग फुटले. विशेष म्हणजे अघोरी पुजेसाठी सोनार समाजातील युवकांना लक्ष्य केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. चांगली बायको मिळवून देण्याचे आणि पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून हा सर्व प्रकार सुरु होता. त्यामुळे यात नरबळी देण्याचा प्रकार होता का याबाबत तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मांत्रीकासह दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.






























































