शॉर्टसर्किटने ट्रॅक्टरच्या शोरूमला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

पाथर्डी नगर रोडवर असलेल्या पूजा ऑटोमोबाईल या ट्रॅक्टरच्या शोरूमला गुरूवारी सकाळी नऊच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरीही शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पाथर्डी नगर रोडवर माळी बाभूळगाव हद्दीत भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांचे पूजा ऑटोमोबाईल हे ट्रॅक्टरचे शोरूम असून या शोरूमच्या मागील बाजूने धूर निघत असल्याचे या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्या नंतर त्याने परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. घटनेची माहिती माणिक खेडकर यांना दिली. राष्ट्रीय महामार्गावर हे शोरूम असल्याने बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली होती. खेडकर यांनी तातडीने वृद्धेश्वर कारखाना व नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावले मात्र अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. शोरूम मधे ऑइल असल्याने आग मोठ्या प्रमाणात इतरत्र पसरली. शोरूमच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी रॅकचे गज सुद्धा लागलेल्या आगीने वितळले होते. खेडकर यांनी पुढील बाजूचे शटर उघडून ऑफीस मधे असलेले फर्निचर नागरिकांच्या मदतीने बाहेर काढल्याने शोरूम च्या पुढील बाजूस आग पसरली नाही. अग्निशामक दलाच्या गाड्या आल्यानंतर दोन तासात आग आटोक्यात आली. या घटनेत नेमकी किती रुपयांची वित्तीय हानी झाली हे समजू शकले नसले तरीही जवळपास ६० ते ६५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती खेडकर यांनी दिली.