
सामना ऑनलाईन, मुंबई
प्रोफेशनल बॉक्सिंगचा किंग माईक टायसन पहिल्यांदाच हिंदुस्थानात आला. निमित्त होते मिक्स मार्शल आर्टस् कुमिते लीगचे. मुंबईतील धारावी या ‘स्लम’ विभागात मला जायचे आहे. तेथील मुलांना पाहायचे आहे. कारण मीही छोट्याशा भागातूनच आलोय. झोपडपट्ट्यांमधूनच चॅम्पियन खेळाडू घडतात, असा दमदार ठोसा या दिग्गज खेळाडूने मुंबईत शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला.
माईक टायसन याने 50 लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारलीय. यावेळी विजयातील सातत्याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला, “प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही. सातत्याने प्रयत्न करायला हवे. अपयशाने निराश होऊ नये. कधीही हार मानू नये”, असा सल्ला माईक टायसन याने युवा खेळाडूंना यावेळी दिला.
आक्रमकता त्यांच्या नसानसात भिनलेली
झोपडपट्टय़ांमधील मुलांच्या नसानसात आक्रमकता भिनलेली असते. याचा फायदा बॉक्सिंगमध्ये होतो. याच कारणामुळे मला धारावीत जायचे आहे, तेथील मुलांना पाहायचे आहे. कदाचित येथून भविष्यात अव्वल दर्जाचा खेळाडू तयार होईल, असा विश्वास पुढे त्याने व्यक्त केला. दरम्यान, टायसनच्या मागणीमुळे आयोजकांना धक्का बसला आहे. स्लम भागात त्याला कसे न्यायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.



























































