जन्मदात्या आईचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन । जालना

जन्मदात्या आईचा डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या जालना येथील गणेश किसन पारे यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश- ३ एन. आर. प्रधान यांनी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जुन्या जालन्यातील बरवार गल्ली येथे राहणारा गणेश किसन पारे हा त्याची पत्नी आशाबाई हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन मारहाण करीत असे. यामध्ये अनेकदा त्याची आई ताराबाई पारे या मध्यस्थी करून वाद मिटवत असत. पत्नीला मारहाण करताना मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून 23 सप्टेंबर 2016 रोजीच्या पहाटेपूर्वी गणेश पारे याने आई ताराबाई यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा निर्घृण खून केला होता.

याप्रकरणी मृत ताराबाई यांचा भाऊ प्रभूलाल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केले होते.  याप्रकरणात सुनावणी दरम्यान न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने १६ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यापैकी फिर्यादी, आरोपीस  घटनास्थळी पाहणारे साक्षीदार, पंच, तापसिक आमलदार एस. एच  सय्यद, वैद्यकीय अधिकारी सुरजित अंभोरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि समोर आलेल्या पुराव्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश- ३ एन. आर. प्रधान यांनी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांनी काम पहिले.