
सामना प्रतिनिधी । मुंबई
यंदा साहित्य संमेलनाध्यक्षाचे इलेक्शन नाही तर सिलेक्शन होणार, असा निर्णय झालेला असतानाच 99व्या नाट्यसंमेलनाध्यक्षपदी कोण याचीही चर्चा रंगू लागली आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी सुरेश साखळकर, प्रेमानंद गज्वी, श्रीनिवास भणगे आणि अशोक समेळ या चौघांची नावे सुचविण्यात आली असून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 99व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार चारजणांचे अर्ज परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. साखळकर यांचे नाव सुहास जोशी यांनी सुचवले असून प्रेमानंद गज्वी यांच्या नावाची शिफारस सातजणांनी केली आहे. तर श्रीनिवास भणगे यांचे नाव सुरेश देशमुख व अशोक समेळ यांच्या अर्जावर सूचक म्हणून किरण वालावलकर यांची स्वाक्षरी आहे. संमेलनाध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे लवकरच जाहीर करू, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले.






























































