पेट्रोलने शंभरी गाठल्यास किंमतीचे आकडे दाखवणारी यंत्रणा बंद होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांन भरडून निघत आहेत. मात्र, या वाढत्या दरांमुळे पेट्रोलियम उद्योगासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठल्यास पेट्रोल पंपावर किंमत आणि लिटर दाखवणाऱ्या डिस्पेंसिंग युनिट यंत्रणा म्हणजेच मीटर बंद पडणार आहेत. त्यामुळे पेट्रोलच्या दराने शंभरी गाठण्यापूर्वी ही समस्या सोडवण्याची गरज व्यक्त होत आहे. ही यंत्रणा दशमान पद्धतीप्रमाणे दोनअंकी दर दाखवू शकते. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठल्यास 99 रुपये 99 पैसे एवढीच किंमत या मशीन दाखवू शकतात. त्यानंतर 100 किंमत दाखवण्याची सोय त्यात नाही. त्यामुळे पुढील आकडे 00.00 दिसणार आहेत. या मशीन बंद झाल्यास काम कसे करायचे अशी समस्या पेट्रोलियम कंपन्यांसमोर आहे.

या मशीन दशमान पद्धतीप्रमाणे सेट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन अंकी किंमतच त्यात दिसू शकते. या मशीन डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की, पेट्रोलच्या किंमती कधी 100 रुपयांवर पोहचतील. आता सर्व यंत्रणांना शेवटच्या क्षणी जाग आली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटरला 100 रुपयांच्या पुढे गेल्यास पेट्रोल कंपन्यांना त्याचा फटका बसणार असून त्यांना भूर्दंड सोसावा लागणार आहे, असे ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. प्रभाकर रेड्डी यांनी सांगितले. आता ही यंत्रणा अद्यायावत करण्यास बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे मशीन बंद झाल्यावर काम कसे करायचे अशी मोठी समस्या उभी राहिली आहे. पेट्रोलचे वाढते दर बघता हे दर शंभरी गाठण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सध्या देशातील काही शहरात पेट्रोलचे दर 90 रुपयांवर गेले आहेत.