
सामना प्रतिनिधी । भोकर
आश्चर्यचकित झालात ना..? देशभरात पेट्रोलचे भाव झपाट्याने शंभरीपार जात असताना भोकर शहरात मात्र चक्क एक रुपयात पेट्रोल! सदर ‘पेट्रोल’ म्हणजे इंधन नव्हे तर अवैध मार्गाने शहरात खुलेआम विक्री होत असलेल्या गुटख्याचे नाव आहे. एकीकडे राज्यात गुटखा बंदी सुरू आहे परंतु अन्नभेसळ खाते व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने भोकर शहरात मात्र खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे.
या गुटखा व्यवसायात अनेक व्यवसायिक गुंतले असून आपल्या उत्पादनाकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची विविध प्रकारे धडपड सुरू आहे. वेगवेगळ्या नावाने गुटख्याची उत्पादने बाजारपेठेत विकल्या जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारपेठेत पेट्रोल, वजीर, हिरा,आदत अशा विविध नावाचा गुटख्याच्या पुड्या एक रुपयात प्रत्येक पान टपरीवर व किराणा दुकानात सहज रित्या उपलब्ध होत आहेत. किराणा दुकानात अथवा पानपट्टीवर चिल्लर एक रूपया देऊन पेट्रोल द्या, अशी मागणी ग्राहक करतात. तेव्हा याबाबत अनभिज्ञ असलेल्या इतर लोकांना मात्र आश्चर्याचे धक्के बसत आहेत.
गुटखा शरीरास घातक आहे व अनमोल किंमत असलेल्या शरीराची या पेट्रोल गुटख्याने धूळधाण करण्याचा चंग अनेक जणांनी बांधल्याचे दिसत आहे. शरीरास घातक असलेल्या पेट्रोलची किमंत केवळ एक रूपया आहे तर काही हजार, लाखांची किंमत असलेल्या वाहनांचे इंधन असलेल्या पेट्रोलची किंमत मात्र शंभरीपार घौडदौड करत आहे. आपण ते महागडे पेट्रोल तर घेऊ शकत नाही मग एक रुपया वालेच घेऊ या भावनेतून या एक रुपये वाल्या पेट्रोलची खरेदी मात्र धुमधडाक्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे.


































































