
सामना ऑनलाईन । सॅमसन
हिंदुस्थानच्या दीपिका कुमारीने तुर्कीत सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी फायनलमध्ये प्ले ऑफ फेरीत लिझा उनरुला अटीतटीच्या झुंजीत नमवत कांस्यपदक पटकावले. 5 सेटमध्ये 5-5 अशी बरोबरी साधल्यावर शूट ऑफमध्येही दीपिका आणि लिझा यांच्यात 9-9 अशी बरोबरी झाली. पण दीपिकाचा बाण केंद्रबिदूच्या अधिक जवळ असल्याने तिला विजयी घोषित करण्यात आले.
विशेष म्हणजे डेंग्यूतून सावरलेल्या दीपिकाने या विश्वचषक फायनलमध्ये प्रशिक्षकांशिवाय चमकदार कामगिरी नोंदवली. आशियाई स्पर्धेनंतर दीपिकाला डेंग्यूच्या तापाने ग्रासले होते. त्यातून सावरत तिने 15 दिवसांच्या सरावानंतर पुन्हा तिरंदाजी मैदानात पदार्पण केले. जकार्ता एशियाडमधून तिला रिकाम्या हाताने परतावे लागले होते. पण तुर्कीतील विश्वचषकात दीपिकाने पुन्हा आपला विश्वास दृढ करीत देशासाठी पदक आणले. मला पदकाचा रंग रुपेरी करायचा होता. पण प्रथमच प्रशिक्षकांशिवाय खेळताना माझी कामगिरी चांगली झाली याचाच आनंद आहे, अशी प्रतिक्रिया दीपिकाने व्यक्त केली. आपली आंतरराष्ट्रीय नोंदणी गमावलेल्या हिंदुस्थानी तिरंदाजी महासंघाला या विश्वचषक फायनलला आपल्या संघासाठी प्रशिक्षक नियुक्त करणे शक्य झाले नाही.
हिंदुस्थानी संघाला 3 पदके
तुर्कीतील विश्वचषक तिरंदाजी फायनलमध्ये हिंदुस्थानी तिरंदाजांनी 2 कास्यपदके आणि 1 रौप्य पदकाची कमाई केली आहे. हिंदुस्थानने रौप्यपदक कंपाऊंड मिश्र तिरंदाजीत पटकावले आहे. जो प्रकार या स्पर्धेत प्रदर्शनीय म्हणून समाविष्ट करण्यात आला होता. शनिवारी अभिषेक वर्माने पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्यपदक पटकावले होते.




























































