कुडाळात गुलमोहर-अनंत मुक्ताई-पोस्ट ऑफीस बसथांबे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ 

कुडाळ गांधीचौक येथील जुन्या बसस्थानकाच्या पुर्नबांधणीचे काम काम जलदगतीने मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून सोमवार 1 ऑक्टोबर पासून या जुन्या बसस्थानकावरून होणारी प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद करून ती महामार्गालगतच्या नवीन बसस्थानकातून वळविण्याचा निर्णय एस.टी. प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हॉटेल गुलमोहर, अनंत मुक्ताई हॉल व पोस्ट ऑफिस कार्यालय असे तीन बसथांबे प्रवाशांसाठी  निश्चित केले आहेत. सोमवार पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे तसेच प्रवाशांना याबाबत माहिती देण्यासाठी चार ते पाच दिवस जुने बसस्थानक येथे कंट्रोलर तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख सुजीत डोंगरे यांनी दिली.

 जुन्या बसस्थानकावरून होणारी प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून युध्दपातळीवर बसस्थानकाचे काम करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेत त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरात हॉटेल गुलमोहर, अनंत मुक्ताई हॉल व पोस्ट ऑफिस कार्यालय जवळ असे तीन बसथांबे निश्चित केले असून तेथे प्रवाशी चढ-उतार करण्यात येणार आहे.

बस नवीन बसस्थानकावरून सुटल्यावर हॉटेल गुलमोहर येथील थांब्यावर थांबेल. नंतर अनंत मुक्ताई हॉल व पोस्ट ऑफिस कार्यालय जवळील थांब्यांवर थांबून प्रवाशी चढ-उतार करून मार्गस्थ होईल. कणकवली, देवगडच्या दिशेने जाणार्‍या तसेच घावनळे, निवजे, तुळसुली, कुसगाव, हिर्लोक, नारूर, हिंदेवाडी, घाडगे, पांग्रड, कसाल, सुकळवाड या भागात धावणार्‍या गाड्या नवीन बसस्थानकावरून सुटून राज हॉटेल मार्गे पोलिस स्टेशन-पोस्ट ऑफीस-अनंत मुक्ताई-गुलमोहोरमार्गे प्रवाशी चढ-उतार करून पुढे मार्गस्थ होतील.

परतीच्या गाड्या नवीन बसस्थानक-गुलमोहोर-अनंत मुक्ताई-पोस्ट ऑफीस-राज मार्गे नवीन बसस्थानक येथे जातील. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी मार्गांसह वालावल, भोगवे, कवठी, निवती, दुतोंड, केळूस, कालवीबंदर, गोवेरी, परूळे, म्हापण तसेच माणगांव खोर्‍यात जाणार्‍या गाड्या नवीन बसस्थानकावरून सुटून गुलमोहर हॉटेल – अनंत मुक्ताई – पोस्ट ऑफिस येथे प्रवाशी चढ – उतार करून पुढे रवाना होतील तर या भागातून येणार्‍या गाड्या पोस्ट ऑफिस – अनंत मुक्ताई हॉल-गुलमोहोरमार्गे नवीन बसस्थानक येथे जातील अशी माहिती आगारप्रमुख सुजीत डोंगरे यांनी दिली.

तसेच जुन्या बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना याबाबत माहीती देण्यासाठी तेथे चार ते पाच दिवस कंट्रोलर नियुक्त करण्यात येणार आहे. जुने बसस्थानक पूर्णपणे पाडून युध्दपातळीवर नवीन इमारतीचे काम हाती घेऊन लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पास व आरक्षण केंद्रही हलविणार

शालेय पास व आरक्षण केंद्र सध्या दोन-चार दिवस जुन्या इमारतीच सुरू ठेवण्यात येणार आहे. हे केंद्र पर्यायी जागेत हलविण्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार तसेच चर्चा करण्यात येत आहे. जागेबाबत उपलब्धता होताच हे केंद्र पर्यायी जागेत हलविले जाणार आहे असे आगारप्रमुख सुजीत डोंगरे यांनी सांगितले.