कवठा येथील ११-१२ व्या शतकातील दुर्लक्षित शिवमंदिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला अतिप्राचिन परंपरा लाभलेली आहे. गावागावातील कांही मंदिरे, वास्तू त्याची साक्ष देत असतात. धाराशिव जिल्ह्यातील मौजे कवठा हे छोटे गाव. ११-१२ व्या शतकातील प्राचिन हेमाडपंथी शिवमंदिर, शिलालेख आणि श्री विष्णूंची श्री केशव स्वरुपातील अप्रतिम अशी मुर्ती हे या गावचे वैशिष्ट्य आहे. परंतु या तिन्ही गोष्टींकडे दुर्दैवाने कुणीही लक्ष दिलेले नाही. इतिहासाबद्दल अनास्था असल्याकारणामुळे महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील अनेक पुरातन वास्तू, मंदिरांकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.

या मंदिराची माहिती देताना या गावचे ग्रामस्थ शेषेराव किशनराव माने यांनी सांगितले की, सुमारे १२ व्या शतकातील यादव कालीन हेमाडपंथी शिवमंदिर गावात आहे. पुर्वाभिमूख असणारे हे मंदिर जतीवर उभे आहे. पंचरथ प्रकारातील मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वार, सभामंडप, अंतराळ, गाभारा आणि गाभाऱ्यातील शिवपींड आणि मंदिरासमोर असणाऱ्या नंदीमंडपामध्ये असणारा भव्य असा नंदी सर्वांचे लक्ष वेधून घेतो. नक्षीदार स्तंभ, दोन देवकोष्टके आहेत. अतिशय डौलदार असा नंदी, त्याचे पाय, पायाचे खूर, बलदंड वशिंड, मान व गळ्यातील घागरमाळा, पाठीवर दोरखंडाची गाठ, एकसंघ दगडातील हे नदीचे शिल्प म्हणजे सुध्दा शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. नंदी मंडपाच्या बाजूला मोठी बारव आहे.

या मंदिरासमोरच एक शिलालेख आहे. हा शिलालेख कन्नड भाषेतील असून कल्याणीच्या उत्तर चालुक्य घराण्यातील तिसरा राजा सोमेश्वर (कालखंड ११२६ -११३८) यांच्या काळातील आहे. शिलालेखाची उंची १८० सें. मी. आहे तर रुंदी ९० सें. मी. आहे. शिलालेखावर ठसठसीत अशी कन्नड भाषेतील अक्षरे आहेत. त्याच्यावरील बाजूस महादेवाची पिंड, चंद्र, सुर्य, गाय, पाल व राजा याचे उठावाचे शिल्प आहे. या शिलालेखाचे वाचन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच धारवाड विद्यापीठाच्या वतीने करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याच्यावतीनेही संशोधन करण्यात आलेले आहे.

शिल्पकलेचा अत्यंत सुदर आणि चित्तवेधक तितकीच दुर्मिळ रचना म्हणजे श्री विष्णूंची श्री केशव स्वरुपातील मुर्ती. ही मुर्ती सापडल्याची अख्यायिकाही सांगितली जाते. सन १९४४ च्या सुमारास गावातील गोविंदराव कुलकर्णी (वकील) यांच्या शेतात नांगरणी करत असताना काळयाभोर जमिनीत नांगरास दगड लागला. त्याठिकाणी दगड मोठा म्हणून खणून पाहिले असता अत्यंत सुंदर अशी मुर्ती निदर्शनास आली. प्रारंभी हि मुर्ती कांही काळ शेतातच एका झाडाखाली ठेवण्यात आली. नंतर ग्रामस्थांनी वाजत गाजत ही मुर्ती गावात आणली व हेमाडपंथी शिवमंदिरात ठेवली गेली. त्यावेळपासून या मंदिरासही विष्णूचे मंदिर म्हणूनच संबोधले जाऊ लागले होते. १९९३ च्या भुवंâपानंतर हे मंदिर खिळखिळे झाले म्हणून ही मुर्ती पुन्हा स्थलांतरीत झाली. नवीन कवठा गावात प्रारंभी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आली त्यानंतर मंदिर बांधून प्रतिष्ठापणा करण्यात आली.

ही मुर्ती पाहण्यासाठीही अनेक इतिहास तज्ञांनी कवठा येथे भेटी दिलेल्या आहेत. कांही जणांनी ती कर्नाटकातील हेळीबीडची तर कांही जणांनी हंपी (विजयनगर) येथील असावी असा अंदाज व्यक्त केला. १२ – १३ व्या शतकात ही मुर्ती मुसलमानांच्या मंदिर, मुर्ती तोडफोडीतून वाचवण्यासाठी या भागात आणली असावी असेही सांगितले जाते.

सर्वांना ही मुर्ती श्री विष्णूंचीच असल्याचे माहिती आहे. मात्र ती श्री विष्णूंच्या केशव अवताराची आहे. कारण चतुर्भूज असणाऱ्या या मुर्तीच्या उजवीकडील वरच्या हातात शंख, खालच्या हातात पद्म, डावीकडील वरच्या हातामध्ये चक्र तर खालच्या हातामध्ये गदा आहे. बेसाल्ट या काळया पाषाणात कोरलेली ही अत्यंत मनमोहक अशी मुर्ती आहे. उंची ११० सें.मी. तर रुंदी ६० सें.मी. आहे. मुर्ती शिल्पावर दक्षिणेकडील होयसाळ कलेची छाप दिसून येते. हाताच्या नखासहित नाजूक बोटे, लावण्यमय मुद्रा, शरीरावर भरजरी दागिने, पादजालक, पादवलय, वनमाला, मुक्तदाम, कटक वलय, कटीसुत्री, उदरबंद, केयुर, बाजूबंद, कुडल, कौस्तूभ मणीसह उंच किरीट मुवूâट, पाठीमागे प्रभावळ व दशावताराचे कोरीव शिल्प आहे. शिरोभागी होयसाळ राजाचे किर्तीमुख हे चिन्ह व चरणाजवळ जय, मय हात जोडून उभे असलेले दिसतात. शिल्पकलेचा एक अतिसुंदर अविष्कारच म्हण्जे ही श्री केशवाची मुर्ती आहे. हा अमुल्य ठेवा शासनाने जतन करणे आवश्यक आहे अन्यथा कालौघामध्ये हा अमुल्य ठेवा नष्ट होईल व केवळ इतिहासजमाच राहील.