खेड आंबवली विभागाला वादळी पावसाचा तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । खेड

खेड तालुक्यातील आंबवली विभागात वादळी पावसाने चांगला तडाखा दिला. सलग दोन दिवस या परिसरात झालेल्या वादळीपावसामुळे अनेक घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झाले. वीजेचे खांब उन्मळून पडल्याने हा संपुर्ण परिसर अंधारात बुडून गेला. शाळा, दुकानांचेही यामध्ये नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली.

गणेशोत्सवादरम्यान दडी मारलेल्या पावसाने गेले चार दिवसांपासून तालुक्यात कमबॅक केले आहे. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि सोबत सोसाट्याचा वारा यामुळे ग्रामीण भागात पडझड होवू लागली आहे. सोमवारी सायंकाळी आंबवली विभागातील अनेक गावांना वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या चक्री वादळामुळे अनेकांच्या घरांची कौले आणि शेडचे पत्रे उडाले. काही ठिकाणी गोठ्याचेही नुकसान झाले.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंबवली येथील न्यु इंग्लिश स्कूल आंबवलीच्या वाचनालयाची पत्राशेड, किशोर यादव व अशोक यादव, अनील राणे यांच्या घराची कौले उडून नुकसान झाले. चाटव येथील सजन शिर्के यांच्याही घराचे या वादळात नुकसान झाले. याच गावातील पाटणे यांच्या घरासमोरील पत्राशेडवरील पत्रे तसेच बाबाजी गोरे यांच्याही घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे नुकसान झाले.

वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडल्याने सोमवारी सायंकाळीच या परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. रात्रभर वीज नसल्याने कालची सपुर्ण रात्र नागरिकांना अंधारात काढावी लागली. या परिसरात वादळी वारा आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची खबर ग्रामस्थांनी महसुल विभागला दिल्यानंतर खेडचे तहसिलदार अमोल कदम यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबधित यंत्रणेला दिले.

मंगळवार सुट्टीचा दिवस असल्याने सलग दोन दिवस या परिसरात झालेल्या एकूण नुकसानीचा तपसील उपलब्ध होवू शकला नाही. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दोन दिवसात या परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.