
सामना ऑनलाईन,मुंबई
मुंबई आणि विरार मेट्रो लाइनने जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. सध्या वसई-विरार हे लोकलने जोडले गेले आहे. परंतु त्या मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे प्रवासासाठी नवा पर्याय असावा अशी मागणी होती. त्यासाठीच विरारपर्यंत मेट्रो नेण्याची एमएमआरडीएची योजना आहे.
मीरा-भाईंदर आणि विरारदरम्यान मेट्रो रेल्वेसाठी दिल्ली मेट्रो रेल महामंडळ योजना बनवत आहे. दहिसर ते मीरा-भाईंदरदरम्यान मेट्रो-9 प्रकल्प राबवला जाणार आहे. तोच पुढे विरारपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबई आणि विरार दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाजवळून ही मेट्रो लाइन जाऊ शकते, परंतु अद्याप त्याबाबत काहीच ठरवण्यात आलेले नाही. विरारपर्यंत मेट्रो रेल्वे लाइन पश्चिम रेल्वेला किंवा राष्ट्रीय महामार्गाला समांतर अशी टाकता येऊ शकते असे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे म्हणणे आहे. प्रवासाचे पर्याय निर्माण करतानाच एमएमआरडीएने रोजगारनिर्मितीवरही भर द्यावा. जेणेकरून लोकांना नोकरीसाठी मुंबईत यावे लागणार नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे.


























































