
चारचौघांसमोर उभं राहून घडाघडा भाषण करणं हे सोपं काम नाही, पण हृषिकेश डाळे याचा वक्तृत्व स्पर्धेत कुणीच हात धरू शकत नाही. भाषण हाच त्याचा छंद आहे.
हो… भाषण करणं हाच माझा छंद आहे. मला हा छंद माझ्या लहानपणापासूनच जडलाय. आमच्या शाळेत नंतर बाहेरील अनेक ठिकाणी तेव्हा वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या. इतर कुठल्या नाही, पण वक्तृत्व स्पर्धेत मी हटकून भाग घ्यायचो. त्यातूनच कधीतरी माझ्या या आवडीचं रूपांतर माझ्या छंदात झालं असावं. वक्तृत्व कला मला खूप छान अवगत झाली आहे.
खरं तर मी ज्यावेळी मोकळा असतो तेव्हा करण्यासारखा माझा हा छंद नाही. हा छंद माझ्या मनात आणि रोमारोमात बसलेला आहे. मला आठवतंय, माझ्या आईबाबांनी माझ्या लहानपणी माझी भीती मोडावी यासाठी मला खूप प्रोत्साहन दिलं होतं. शाळेत मी भाषण केलं की, त्यांना कोण आनंद व्हायचा… मग 1 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर आणि 4 जुलै या दिवशी शाळेत हमखास स्पर्धा असायची. तेव्हा मी भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा असायची. मग सुरुवातीला भाषण त्यांच्याकडून लिहून घेऊन ते घोकंपट्टी करत पाठ करायचो, पण नंतर नंतर मला पाठांतराचा कंटाळा यायला लागला. आपण एखादा विचार करून त्यावर लिहिलं, मुद्दे काढले तर ते मला जास्त सोपं वाटायला लागलं. यातूनच तिसरी-चौथीमध्ये असताना आंतरशालेय स्पर्धेत मराठी विषयात क्रमशः तिसरा आणि पहिला क्रमांक पटकावल्यानंतर मात्र मी यात जास्त रस घेऊ लागलो. मग पुस्तकं वाच, नाटकात काम कर असं करत करत या वक्तृत्वामध्ये पारंगत झालो. वाचन वाढल्यामुळे आयत्या वेळी दिल्या गेलेल्या विषयांवरही मी धडाधडा बोलू शकत होतो.
हे झालं मराठी भाषेतील भाषणांबाबत… पण मलाच नंतर वाटलं, काहीतरी वेगळं करायला हवं. मग सातवीला असताना हिंदीमधून सुद्धा वक्तृत्व करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कठीण गेलं, पण मग आठवी-नववीत असताना सलग दोन वर्षे आमच्या शाळेला प्रथम क्रमांक आणि ट्रॉफी मिळवून दिली. मग हळहळू लिहायला पण लागलो. कॉलेजला आल्यावर तयारीची पद्धत थोडी बदलली. शिक्षक आणि इतर जाणकारांकडून एकाच वेळी बर्याच विषयांची माहिती घ्यायला लागलो. ती मनोमन साठवू लागलो. मग त्या त्या विषयावर बोलायला लागलो. या वक्तृत्वामुळे मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण भाषण करण्यापेक्षा त्यासाठी केलेल्या तयारीचे समाधान मला जास्त मिळते. अजूनही बरंच काही वाचायचंय आणि अधिक चांगलं बोलण्यासाठी प्रयत्न करत राहायचंय.
हृषिकेष डहाळे, फिनोलेक्स महाविद्यालय रत्नागिरी






























































