
सामना ऑनलाईन । वसई
वसई-विरार महापालिकेचा फरार नगरसेवक खंडणीखोर धनंजय गावडे याच्यावर नालासोपाऱयातील तुळींज पोलीस ठाण्यात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवडय़ाभरापूर्वीच एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गावडे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. खंडणीचे अनेक गुन्हे असलेला आणि गेल्या काही महिन्यांपासून फरार झालेल्या गावडेवर बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाल्याने त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची पथके गुजरातला रवाना करण्यात आली आहेत.
नोटबंदीच्या काळात गाडीत बेहिशेबी कोटय़वधी रुपये सापडल्याने नगरसेवक धनंजय गावडे चर्चेत आला होता. त्यापाठोपाठ त्याच्यावर खंडणी मागितल्याचे सात गुन्हे दाखल झाले होते. या कारनाम्यामुळे शिवसेनेतून त्याची हकालपट्टी झाली होती. खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर गावडे एप्रिल महिन्यापासून फरार झाला आहे.
गेल्या आठवडय़ात एका राजकीय पक्षाच्या 34 वर्षीय महिला कार्यकर्तीने गावडेच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. 2016 मध्ये गावडे याने त्याच्या कार्यालयात बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवत बलात्कार केला व अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी दिल्याची तक्रार या महिलेने दिल्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी बलात्कार व शस्रास्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
या घटनेला आठवडा उलटण्याच्या आतच मुंबईतील आणखी एका 32 वर्षीय पीडित तरुणीने तुळींज पोलीस ठाण्यात गावडेच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून 2017 मध्ये दोनवेळा बलात्कार केला, अशी तक्रार या तरुणीने दिली आहे. त्यावरून गावडेवर आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावडे गुजरातमध्ये लपून बसल्याचा संशय पोलिसांना आहे.
खंडणी उकळण्याची मोडस ऑपरेंडी
वसई-विरारमधील कोणतेही बांधकाम असो, त्याविरोधात आरटीआयअंतर्गत अर्ज दाखल करायचा, ते बांधकाम अनधिकृत ठरवायचे आणि ते अधिकृत करून देतो असे सांगत सर्वसामान्य लोकांकडून, बिल्डर्सकडून लाखो रुपयांची खंडणी उकळायची हीच गावडेची मोडस ऑपरेंडी आहे. बेकायदा बांधकाम विरोधी मोहिमेंतर्गत दाखल झालेल्या एकूण 16 गुह्यांपैकी 7 गुन्हे धनंजय गावडेवर आहेत.


























































