शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ

प्रतिवर्षीप्रमाणे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दुर्गामाता दौडला बुधवारी परळीत मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत या दुर्गामाता दौडीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. स्वराज चौक, 40 फुटी रस्त्यावरून पहाटे सहा वाजता दौडीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

शिव-शंभु रक्त गटाची पिढी निर्माण व्हावी यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे राज्यभरात गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गामाता दौड काढण्यात येते. माँसाहेब जिजाऊंनी कुलस्वामीनीकडे हिंदू स्वराज स्थापनेसाठी वरदान मागितले होते. या वरदानानेच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, आता हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकांत देव, देश आणि धर्माचे रक्षण करण्याची प्रेरणा जागृत रहावी म्हणून दुर्गामाता दौड काढण्यात येते.

आजची दुर्गामाता दौड स्वराज चौक, संत सावतामाळी मंदिर, संत नरहरी महाराज मंदिर, कृष्णा नगर या भागातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. ठिकठिकाणी पवित्र भगव्या ध्वजाची सुवासिनींच्या हस्ते पूजा करण्यात आली. या दुर्गामाता दौडीसाठी परिसरातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ‘जय जय जय भवानी जय जय जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’ या सारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.