जागर आंतरिक सामर्थ्याचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

डॉ. तारा भवाळकर…दुर्गादेवीचे स्वत्व त्यांनी स्वतःत भिनवून घेतले आहे… म्हणूनच सबला असण्याचा खरा अर्थ त्यांच्या लेखणीतून… वाणीतून उलगडतो..

डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हाचा. नुकतंच 80 व्या वर्षात पदार्पण केलंय त्यांनी. ‘आमच्या वेळी तारखा नोंदवून ठेवण्याचा प्रघात नव्हता. त्यामुळे कागदोपत्री 1 एप्रिल आणि आईच्या पंचांगाप्रमाणे भाद्रपद वद्य द्वितीया अशा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या माझ्याही दोन दोन जन्मतारखा आहेत.’ अशी गमतीदार सुरुवात करत त्या बोलायला लागल्यानंतर, वयाचं अंतर पुसून मैत्रीच्या समान पातळीवर गप्पा रंगायला लागल्या आमच्या. ‘जात्यावर प्रत्यक्ष दळून ओव्या पाठ केलेली बहुतेक मी त्या पिढीतली शेवटची स्त्री असेन’ हे त्यांचं वाक्य, त्यांच्या प्रचंड अनुभव विश्वाचा खजिना माझ्यापुढे आता रिता होणार याचीच साक्ष देत होतं.

शेतीप्रधान कुटुंब. पिंपळेजगताप गाव. कधी खेडय़ातल्या शाळेत तर कधी पुण्यातल्या महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण. शेती सोडून शहराकडे धाव घेणाऱया पिढीतली त्यांची दुसरी पिढी. ‘मी परंपराशील वाडा संस्कृतीतली मुलगी. कीर्तन, प्रवचन, व्रतवैकल्यं होतीच तिथे. अकरावीपर्यंत 8-9 शाळा झाल्या माझ्या. वडिलांची रेल्वेमधली बदलीची नोकरी. वडील सातवी तर आई दुसरीपर्यंत शिकलेली. आई अतिशय बुद्धिमान. म्हणूनच काळानुसार नवे प्रश्न तिच्या मनात निर्माण व्हायचे.’ ताई सांगत होत्या. परंपरांबद्दल आकस न धरता, त्याकडे आस्थापूर्वक बघून त्याचं विश्लेषण करण्याची त्यांची विचारसरणी त्यांच्या आईकडूनच त्यांच्याकडे प्रवाहित झाली असणार हे जाणवलं. कीर्तन, प्रवचन याबरोबरच तमाशा आणि लावणी पाहणाऱया ताराताईंचा, नागरी ग्रामीण आणि लोकजीवनाशी इतका जवळून संबंध आला की, त्या अनुभवांचा लोककला अकादमीच्या पहिल्या संस्थापक सदस्यांमध्ये त्या असताना इतरांना नक्कीच उपयोग झाला असणार. अकरावी एसएससीनंतर अर्थार्जनाची निकड म्हणून नोकरी करणाऱया आणि 12-13 व्या वर्षापासूनच अर्थार्जनासाठी, दहा पैसे तासावर शिवण मशिन घेऊन कपडे शिवून देणाऱया ताई पुन्हा हसत हसत म्हणाल्या, ‘अगदी पडद्यापासून सगळ्या गोष्टी घरात शिवत असल्यामुळे आजवर शिंप्याला मी एक पैसाही दिलेला नाही.’

शिक्षकांमुळे त्या कशा घडल्या हे सांगताना त्यांनी वानगीदाखल बोकील सरांचा किस्सा सांगितला. ‘पुण्यात राहत होतो. तीन मुलींनंतर आईला मुलगा झालेला. सकाळी आईनं दार उघडलं, तर दारात लिंबू. कोणीतरी टाकलेलं. ती किंचाळली. बोकील सर शेजारीच राहायचे. त्यांनी त्यातल्या खोबऱयाची चटणी केली. लिंबू स्वयंपाकात वापरलं आणि मला रांगोळी काढायला सांगून गुलाल त्यात भरायला लावला. सगळं भयंकर, अघटित, क्षणार्धात देखणं आणि सुंदर झालं. ‘भुताची कधी भीती वाटली तर ते म्हणायचे भेटलंच कधी भूत, तर त्याला सांगा शत्रुसैन्याशी लढायला सीमेवर जा आणि तिथे चमत्कार करून घाबरव त्यांना. दक्षिणेकडे पाय करून झोपले की यम येतो असं चुलतआजी म्हणाली की चुलतआजोबा म्हणायचे, येऊ द्या. लाथ घालेन त्याला. डोकं दक्षिणेकडे ठेवलं आणि त्यानं गळा आवळला तर काहीच करू शकणार नाही मी.’ पुढे अंनिसमध्ये काम करत असताना ताराताईंना या संस्कारांचा निश्चितच फायदा झाला असणार.

‘परिस्थितीमुळे कॉलेजमध्ये शिक्षणासाठी न जाता शिकवण्यासाठीच गेले मी’ हेही त्यांनी सहजच हसत हसत सांगितलं. बाहेरून अभ्यास करूनच, कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून, डॉक्टरेट मिळवण्यापर्यंत मजल मारणाऱया ताराताई हसतच पुढे म्हणाल्या, ‘डिग्री बदलली की नोकरी बदलायची माझी. अधिक चांगली मिळायची ना ती. लोकसाहित्य, स्त्रीवाद, नाटय़, अभिनय, संत साहित्य या सर्वांवर अनेक पुस्तकं, ग्रंथ लिहिणाऱया अनेक चर्चासत्रांमध्ये आपली स्पष्ट मतं मांडणाऱया, विविध प्रतिष्ठत पदांवर काम करत, संमेलनांचं अध्यक्षपद भूषवत, अनंत पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या डॉ. तारा भवाळकर.

नवरात्रीच्या संदर्भानं त्यांची मतं जाणून घेताना त्या म्हणाल्या, ‘आपले सण ऋतुचक्राशी बांधलेले आहेत. अश्विनातल्या नवरात्रीच्या दोन व्युत्पत्ती आहेत. गर्भात बाळ नऊ महिने नऊ दिवस वाढतं. तसंच भूमी गर्भात बीज अंकुरतं. म्हणून हा सृजनाचा, निर्मितीचा उत्सव. महालक्ष्मी महासरस्वती, महाकाली या निर्मिती, पोषण, संरक्षण यांच्या देवता. त्यांची उपासना करण्यासाठी नवरात्र. एकनाथ महाराजांनी वर्णिलेली महिषासुरमर्दिनी ही प्रतीकात्मक आहे. मनातल्या वाईट विचारांचं मर्दन करणारी आहे. नदीकाठची माती आणून घट बनवायचे, पंचधान्य पेरायचं आणि पर्जन्याचं प्रतीक म्हणून झेंडूच्या माळा वरून खाली सोडायच्या. दसऱयाला उत्तरपूजा करून अंकुरलेले तृण डोक्यात माळायचे आणि नदीकाठी घट विसर्जन करायचं ही प्रथा. फुलं, पानं, माती यांना महत्त्व असणारे आणि कलात्मकतेला प्राधान्य देणारे आपले सण.

मी वयाच्या बारा-तेरा वर्षांपासून आज वयाच्या 80 व्या वर्षांपर्यंत एकटी राहिले. कामानिमित्त गावोगावी एकटी फिरले. आताच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, तेव्हाही स्वतःच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आणि घरीही स्वतंत्रपणे आले. मुळात स्त्री ही अबला नाही. साडेतीन पीठांची देवींची मंदिरं पाहिली, तर तिथे देवीबरोबर कोणीही सहचर नाही. आज निर्मिती, पोषण आणि रक्षण यांचा विशाल आविष्कार म्हणजे देवी आणि मानवी अवतार म्हणजे स्त्री याची जाणीव स्त्रीलादेखील नाही. मातृसत्ताक पद्धतीमध्ये मनुष्य निर्मिती आणि अर्थ उत्पादनाची साधनं तिच्याकडेच होती. ती अर्थ उत्पादनाची साधने तिच्याकडून हिसकावून घेऊन स्त्रीला घरी बांधलं गेलं. एकीकडे समाज स्त्रीला मातृशक्ती मानतो, पूजनीय म्हणतो आणि ते मातृत्त्व ज्यामुळे प्राप्त होत होतं, ती मासिक पाळी मात्र तिरस्करणीय आणि बहिष्कृत ठरवतो. पापयोनी म्हणतो. ही द्विखंडित मानसिकताच खरं तर तिरस्करणीय आहे. स्त्रीची निर्मिती क्षमता तर कोणीच नाकारू शकत नाही. मूल जन्माला घातल्यावर त्याचं पोषणही दूध पाजून ती स्वतः करते आणि स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तिची क्षमताही तिनं वेळोवेळी सिद्ध केलेलीच आहे.’

मलाही वाटतं, काळानुसार स्वसंरक्षण शिकून, खऱया अर्थानं स्त्रीनं स्वतंत्र व्हायला काय हरकत आहे. आनंदित होण्याचा तिला अधिकार आहे, पण सामाजिक भयापोटी, नाइलाज म्हणून नातं ओढण्याची तिला गरज नाही. निर्भयपणे कार्य करत, कालीमातेच्या प्रतीकारशक्तीचं प्रसंगानुरूप दर्शन देतच तिनं जगलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनासुद्धा स्वतंत्र हिंदुस्थान हा ‘स्वतंत्रते भगवती’ या स्त्राrरूपातच दिसला होता हे आपण विसरता कामा नये. नवरात्रीनिमित्त अनवाणी पायांनी फिरून, कोणीतरी सांगितलेले नऊ रंगांचे कपडे नऊ दिवस घालून, उपास करत ध्वनिक्षेपकाच्या सहाय्यानं कानठळ्या बसणाऱया गाण्यांवर नाचण्यापेक्षा आत्मसन्मान आणि आत्मभानाचा जागर अंतर्मनात झाला तर? सुखी होण्याचा अधिकार स्त्राrला आहे. स्वसंरक्षणासाठी कुणाचाही आधार शोधण्याची तिला गरज नाही हे तिचं तिलाच कळावं यासाठी असावा हा जागर. समाजनिंदेचं भय मनातून काढून टाकावं तिनं आणि जनाबाईसारखं म्हणावं,

‘डोईचा पदर आला खांद्यावरी,

भरल्या बाजारी जाईन मी,

हाती घेईन टाळ, खांद्यावरी वीणा,

आता मज मना कोण करी.’