
अजय जोशी । पाटोदा
संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथे होणारा हा दुसरा दसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्यातच संत भगवानबाबांच्या स्मारकाच्या उभारण्याची घोषणा ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. ती आता पूर्णत्वास येत आहे. या दसरा मेळाव्याला लाखो लोक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय भाषणाला गडावर मंहतांनी परवानगी नाकरल्याने गेल्या वर्षी पासून भगवान बाबांच्या जन्मस्थळी सावरगाव येथे दसरा मेळावा साजरा केला जात आहे. दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. शुक्रवारी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाहणी केली.
भगवानबाबांच्या जन्मभूमीत 2 एकर जागेवर साकारणार भव्य स्मारक
बाबांच्या स्मारकाची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती सध्या स्मारकाचे काम वेगात सुरू आहे ज्ञानेश्वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबांची पंचवीस फुट उंचीची मूर्ती या स्मारकस्थळी उभारण्यात येणार आहे. याच मेळाव्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राज्य शासनाने घोषणा केलेल्या महामंडळाचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मेळाव्याच्या दृष्टीने विविध संत महंतांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, दूरवरुन येणाऱ्यांच्या अल्पोपहार आणि चहापानाची जागोजाग सोय असणार आहे. विविध धार्मिक क्षेत्रावरुन मातीकलश आणले जाणार असून त्याचे पुजन या ठिकाणी होणार आहे.
दसरा मेळावा तयारीचा पोलीस अधिक्षकांकडून आढावा
येथे 18 तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण़्यासाठी पोलीस अधिक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलभुर्मे, पोलीस उपअधिक्षक मंदार नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे यांनी स्मारक मेळाव्याच्या ठिकाणी, हेलीपँडच्या स्थळी पहाणी केली.































































