पारधेवाडीत मुख्यमंत्री दूतांकडून स्वच्छतेचा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किल्लारी

ग्राम विकासाचा ध्यास घेतलेल्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभिमानातील मुख्यमंत्री ग्राम विकास परिवर्तकांनी दि 11 ऑक्टोबर 2018 रोजी पारधेवाडी येथील हागणदारी स्वच्छ करून स्वच्छतेचा जागर घातला. ग्रामस्थांना जास्तीत जास्त शौचालयाचा वापर करावा यासाठी प्रत्येक घरी जाऊन शौचालयाचे महत्त्व सांगत गांधीगिरीच्या माध्यमातून त्यांचे आशिर्वाद घेतले.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात लातूर जिल्हातील ९ गावांची निवड झाली आहे. या ९ गावात ९ ग्राम परिवर्तक काम करतात. त्यातीलच एक पारधेवाडी तालुका औसा हे गाव आहे.

संत गाडगेबाबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन लातूर जिल्ह्यातील ९ ग्राम परिवर्तक सकाळी 6 वाजल्यापासूनच हातात झाडू आणि टोपली घेऊन पारधेवाडी गावलगतच्या हागणदारीत दाखल झाले. त्यांच्या जोडीला सरपंच आणि ग्रामसेवकही आले. त्यातील एका टीमने हागणदारी सफाईची मोहिम हाती घेतली तर दुसऱ्या टीमने शौचास येणाऱ्यांचे आशीर्वाद घेत उघड्यावर न बसण्याची विनंती केली. अवघ्या दोन तासात हागणदारी साफ झाल्यानंतर ग्रामपरिवर्तकांनी आपला मोर्चा गावात गटारीकडे वळवला. बाहेरील व्यक्ती आपली गटार साफ करत असल्याचे पाहून काही महिला आणि पुरूष यात सहभागी झाले, अन् बघता बघता गावातील सर्वात मोठी गटार साफ झाली.

या स्वच्छेतेच्या मोहिमेत जिल्हयातील सर्व ग्रामप्रवर्तक, पारधेवाडी गावचे ग्रामसेवक संजीव माडीबोयने, सरपंच मंगलताई साखरे, ऑपरेटर भोसके गावातील ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदवला.