
सामना ऑनलाईन ।मेरठ
राहणीमान आणि जीवशैलीमुळे अनेक व्यक्ती चर्चेत येतात. मात्र, राहणीमान, जीवनशैली आणि किंमतीमुळे हरयाणातील 12 वर्षांचा युवराज हा रेडा चर्चेत आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि पशू विद्यापीठात प्रदर्शनासाठी आणलेल्या या रेड्याने सर्व शेतकऱ्यांना आकर्षित केले. हा रेडा हा एकच विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. हरयाणातील कुरुक्षेत्राजवळील सोनारिया गावातील शेतकरी कर्मवीर यांच्या मालकीचा मुर्रा जातीचा हा रेडा आहे. युवराजच्या वीर्यापासून कर्मवीर यांनी आतापर्यंत 9 कोटींची कमाई केली आहे. त्याला बाजारात आजही तेवढीच किंमत सहज मिळेल, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. 9 कोटींच्या या रेड्याची बडदास्तही युवराजासारखी ठेवण्यात येते.
याचे नावच युवराज नाही,तर त्याचे राहणीमनही युवराजासारखेच आहे असे कर्मवीर यांनी सांगितले. सकाळी त्याला बदामाचे दूध देण्यात येते. त्याचबरोबर त्याच्या आवडीची फळेही देण्यात येतात. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तूपही देण्यात येते. त्याची मालिश करण्यासाठी दोन कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. युवराजला जमीनीवर बसणे अजीबात आवडत नाही. त्याच्यासाठी गाद्या अंथरून ठेवण्यात येतात. तसेच प्रत्येक तीन तासांनी त्या बदलण्यात येतात. वातावरणानुसार तबेल्यात पंखे, कूलर ,एसी यांची सोय करण्यात आली आहे. युवराजच्या वीर्याला मोठी मागणी असल्याचे कर्मवीर यांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वीच त्याच्या वीर्याची नोंदणी करण्यात येते. इतर रेड्यांपेक्षा युवराजचे वीर्य 20 टक्क्यांनी महाग आहे. त्याच्या वीर्यापासून बनवलेल्या एका इंजेक्शनची किंमत 500 ते एक हजार रुपये आहे. त्याच्या एका वेळच्या वीर्यातून 80 ते 100 इंजेक्शन बनवण्यात येतात. आठवड्यात तीन ते चारवेळा वीर्य काढण्यात येते. आतापर्यंत त्याच्या वीर्यातून 9 कोटींची कमाई झाल्याचे कर्मवीर यांनी सांगितले.
आता युवराज 12 वर्षांचा आहे. या जातीच्या रेड्यांचे आयुष्यमान 24 वर्षांचे असते. त्यामुळे त्याला बाजारात आजही 9 कोटींपेक्षा जास्त किंमत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी 10 जण तैनात करण्यात आले आहेत. युवराज चांगल्या जातीचा सुदृढ रेडा आहे. चांगल्या जनावरांच्या निमिर्तीसाठी युवराजसारख्या रेड्यांचे वीर्य लागते, असे पशुवैद्यकीय कॉलेजचे डीन डॉ. राजवीर सिंह यांनी सांगितले. त्यासाठी त्याची तशीच देखभाल ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

























































