फेसबुकच्या 3 कोटी युजर्सचा डेटा चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
facebook-friend-1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सोशल नेटवर्किंग साइटवरील युजर्सचा डेटा सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फेसबुकच्या 2 कोटी 90 लाख युजर्सचा डेटा हॅकर्सने चोरला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. फेसबुकने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. माहिती चोरीला गेलेल्यांमध्ये हिंदुस्थानातील किती युजर्स आहेत हे मात्र जाहीर केलेले नाही.

‘केंब्रिज ऍनालिटिका’ने फेसबुक युजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचे काही महिन्यांपूर्वी उघड झाले होते. तेव्हा फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी माफी मागितली होती. गेल्या आठवडय़ात झुकेरबर्ग यांनी फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंटस्वर सायबर हल्ला होऊन ते हॅक झाल्याचे जाहीर केले होते. यातील तीन कोटी युजर्सची पर्सनल माहितीचा डेटा चोरीला गेल्याचे आज उघड झाले आहे.

काळजी कशी घ्यावी?
डेटा चोरीला गेलेल्या सुमारे तीन कोटी युजर्सना फेसबुककडून एक मेसेज येणार आहे. त्यानुसार युजर्सने काळजी घ्यावी लागणार आहे. हॅकर्सकडून संशयित मेल, फोन येऊ शकतो. त्याला प्रतिसाद देऊ नये अशी सूचना फेसबुकने केली आहे.

डेटाचा गैरवापर होऊ शकतो
युजर्सची पर्सनल माहिती चोरून 2016 च्या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीत दुरुपयोग करण्यात आला. युजर्सला प्रभावित करण्यात आले. यावेळी डेटा चोरीला गेलेले युजर्स कोणत्या देशातील सर्वाधिक आहेत? हे फेसबुकने जाहीर केलेले नाही. त्यामुळे युजर्सच्या डेटाचा कसा गैरवापर कोणत्या देशात होतो हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही.

याची झाली चोरी
फेसबुक कंपनीने सांगितले युजर्सच्या पेजवर View as सेटिंग असते. हे सेटिंग ओपन केल्यास युजर्सची पर्सनल माहिती दिसते. 1.50 कोटी युजर्सच्या फेसबुक अकाऊंटवरील या सेटिंगचा गैरवापर करून नाव, फोन नंबर, फ्रेंड लिस्ट, ई-मेलची चोरी झाली. 1.40 कोटी अकाऊंटस्वरून युजर्सचे नाव, लिंग, भाषा, धर्म, मूळगाव, सध्याचे ठिकाण, जन्मदिनांक, युजर्सचे शिक्षण, नोकरीचे ठिकाण, युजर्सने पोस्ट केलेला मजकूर, युजर्सचे चॅटिंग याची चोरी केली गेली आहे.

summary- data of 3 crore users got stolen