भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी द्रोणागिरी देवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधूकर ठाकूर । उरण

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथील द्रोणागिरी देवी प्रसिद्ध आहे. द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात विराजमान असलेल्या देवीचा महिमा अगाध आहे. कोळी आगऱ्यांची माऊली म्हणून तीची ओळख आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि भक्तांना पावणारी द्रोणागिरी देवी येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध पावली आहे. येथील उत्सवाला तीनशे वर्षांची पंरपरा आहे. पहाटे अभिषेकानंतर सुरु होणारा टाळ – मृदुंगाचा गजर हा नवरात्रीच्या संपूर्ण कालावधी पर्यंत अखंडरित्या सुरु असतो. द्रोणागिरी देवीचे दर्शन घेण्यासाठी दररोज मुंबई, ठाणे आणि जिल्हाभरातून हजारो भाविक येत असतात.

रायगड जिल्ह्यातील उरण येथील करंजा गावाची देवी म्हणून द्रोणागिरी मंदिरातील देवीची गणना होते. द्रोणागिरी डोंगरावर ही देवी वसलेली आहे. पौराणिक रामायणातील कथेत युद्ध सुरू असताना प्रभू रामचंद्र मूर्छीत होऊन रणभूमीवर पडले. त्यांना शुध्दीवर आणण्यासाठी संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमान रवाना झाला होता. हनुमानाने रामासाठी संजीवनी वनस्पती असलेला डोंगरच उचलून नेला. आकाश मार्गाने जात असतांना डोंगराचा एक भाग करंजा येथे पडला. तोच डोंगर द्रोणागिरी नावाने प्रसिद्ध पावला आहे, अशी एक आख्यायिका असल्याचे सांगण्यात येत आहे. याच डोंगराच्या पायथ्याशी द्रोणागिरी मातेचे मन्दिर उभारण्यात आले आहे. जुन्या मंदिराचे १९९९ साली भव्यदिव्य बांधकाम करण्यात आले आहे. पौराणिक महत्व असलेल्या या देवीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे अभिषेक घालून पूजा अर्चा केली जाते आणि यावेळेस देवीला दागिने आणि मुखवटा घालून तिचा शृंगार केला जातो.

द्रोणागिरी देवीच्या या पूजा – अर्चेनंतर सुरु होतो तो टाळ-मृदुंगाचा नाद. यावेळेस गावातील भक्त मंडळी आळी- पाळीने देवीच्या मंदिरात येऊन भजन- कीर्तन करत असतात. तर या दरम्यान आपल्या हातातील टाळ, मृदुंग आणि चिपळी हे जमिनीवर ‘न’ ठेवता भक्त मंडळी नवरात्रीच्या ९ दिवस टाळ आणि मृदुंग वाजवून आपली सेवा अर्पण करतात.

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी गावातील भक्तगण हे गावातील घरोघरी जाऊन ‘माधुकरी’ मागतात. त्याचा प्रसाद तयार करून भक्तांना दिला जातो. त्यानंतर रात्री देवीची पालखी काढली जाते आणि त्यानंतरच देवीच्या देवळातील टाळ – मृदुंगाचा नाद हा शांत होतो.