समाधी शताब्दी वर्षात सरकार आणि विश्वस्तांकडून केवळ विकासाच्या घोषणाच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

विजया दशमीला साईंच्या समाधीला १०० वर्ष पूर्ण होत असून देशभरात मोठा गाजावाजा करून सरकार व साई संस्थानने समाधी शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या घोषणा केल्या होत्या. 3200 कोटी खर्चाचे विकास आराखडे तयार केले. विकासाच्या घोषणा झाल्या. मात्र एकही विकास काम या सरकारला व संस्थांनला करता आले नाही. कोट्यवधीचा खर्च करून शताब्दी महोत्सवाची सांगता करण्यासाठी पंतप्रधानांना आणण्यात विश्वस्त मंडळ धन्यता मानत आहे. शताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डी व परीसराचा विकास झाला नसल्याने साईभक्त व ग्रामस्थांच्या पदरी निराशाच आली आहे.

गेल्या पाचवर्षांपासून साई समाधी शताब्दी महोत्सवाचे संस्थान विश्वस्त मंडळ व प्रशासनाने ढोल वाजविले. शेकडो बैठका मुंबई व शिर्डीत घेतल्या. कोट्यवधी रूपये खर्चाचे विकास आराखडे तयार केले. केंद्राकडे 3200 कोटींचा निधी मागण्यात आला. मात्र,वर्ष संपेपर्यंत आलाच नाही. विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रूपये खर्च केले. मात्र शिर्डी व साई भक्तांना यातून काय मिळाले, शिर्डीचा काय विकास झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यासह डझनभर मंत्र्यांनी शिर्डीत येवून मोठमोठ्या विकास कामांच्या घोषणा केल्या. मात्र,कोणत्याही प्रत्यक्षात आल्या नाहीत. आता शताब्दी वर्ष सांगतेला पंतप्रधानांच्याहस्ते दर्शन बारी, साई गार्डण व शैक्षणीक संकूल प्रकल्पाचे भुमिपूजन करण्याचा संस्थानचा मानस आहे.

केवळ घोषणा करण्यापेक्षा संस्थानकडे असलेल्या भक्तांच्या दानातील पैशातून एक एक विकास काम पुर्ण केले असते तर आज शिर्डीचा चेहरा मोहरा बदलला असता. संस्थांनचे शेकडो प्रकल्प शासनाकडे मंजूरीसाठी वर्षानुवर्ष पडून आहेत. साईभक्तांच्या दानाचा पैसा भक्तांना सुविधा देण्यासाठी खर्च करण्याऐवजी सरकार ते खिरापतीसारखे वाटत आहे. विश्वस्तांनी वर्षपुर्तीची पुस्तीका काढून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन केले. पुर्वीच्या विश्वस्तांनी केलेल्या अनेक कामाची माहीती या पुस्तीकेत देवून साईभक्त व उपराष्ट्रपतींची दिशाभुल या मंडळाने केली. त्यातून विश्वस्तांविराधात शिर्डीकरात असंतोष उफाळून आला.आंदोलने व विश्स्तांचा अंत्यविधी करण्यापर्यंत आंदोलने शिर्डीत झाली तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले.