मराठवाड्यातील साहित्य चळवळीचा केंद्रबिंदू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत गौतम,[email protected]

ज्येष्ठ समीक्षक, कवी प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांची उदगीर येथे होणाऱया चाळिसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. कांबळे हे साठोत्तरी साहित्यातील दलित, आदिवासी, ग्रामीण स्त्रीवादी प्रवाहातील महत्त्वाचे समीक्षक मानले जातात.

zहित्य चळवळी गतिमान करायच्या असतील तर लेखक आणि कार्यकर्ता हे दोन महत्त्वाचे घटक असतात. आपण एकाच वेळी दोन भूमिकेत आहात. या दोन्ही क्षेत्रांचा प्रवास कसा झाला?

– मी ज्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणात प्रवेश केला आणि वाढलो तो काळ असा होता की, कार्यकर्ता हा लेखक होता आणि लेखक हा कार्यकर्ता होता. आमच्यावर जे काही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय असे संस्कार झाले, ते पूर्णपणे राजकीयविरहीत सामाजिक अभिसरणाचे होते. त्यामुळे सत्तेचा हव्यास अजिबात नव्हता. म्हणून राजकीय भूमिका जरी घेतली तरी राजसत्ताविरहीत अशी होती. म्हणून लेखक असलेला कार्यकर्ता किंवा कार्यकर्ता असलेला लेखक हा एखाद्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा ठेवून कार्यरत झाल्याचे आपल्या लक्षात येते. मग तो कार्यकर्ता युवक क्रांती दलाचा असेल, आंतर भारती असेल, राष्ट्रसेवा दल किंवा दलित पँथरचा असेल. समाजात सर्वंकष समानता निर्माण झाली पाहिजे अशी अभिलाषा होती. त्यामुळे त्याच्याकडे त्याग आणि समर्पणाची भावना होती. या अनेक सामाजिक संघटनांचा इतिहास नीटपणे लिहिला गेला नाही. यासाठी दलित पँथरचे उदाहरण देता येईल. दलित पँथर हे काही केवळ दलित कार्यकर्त्यांचे संघटन नव्हते. यात ब्राह्मण होते, मराठा होते, ओबीसीतील असंख्य जाती होत्या. मुस्लिम होते, ख्रिश्चन होते. अशीच अवस्था अन्य सगळ्या सामाजिक संघटनांची होती. त्यामुळे त्या संघटनांचा चेहराही एखाद्या जातीपुरता मर्यादित होता. मी असे मानतो की, चळवळीला दोन चाके असतात. एका चाकाने तत्त्वज्ञानाच्या विचारांचे बीजारोपण करायचे असते आणि दुसऱया चाकाने रस्त्यावर येऊन मूल्यांसाठी लढायचे असते. काळाचा रेटाच असा होता की, मला या दोन्ही भूमिकांत वावरावे लागले. या दोन्ही क्षेत्रांच्या प्रवासाविषयी मी समाधानी आहे.

साठोत्तरी  साहित्यातील  दलित, ग्रामीण, आदिवासी स्त्रीवादी प्रवाहातील  महत्त्वाचे  समीक्षक  अशी  आपली  ओळख आहे. त्याच सोबत  फुले, आंबेडकर चळवळीचे भाष्यकार,  प्रभावी वक्ते  असाही प्रवास आहे. त्यासंदर्भात…

– आजमितीला ‘दलित’ या शब्दाला न्यायालयाने प्रतिबंध केला आहे, पण दलित साहित्याचा उदय झाला आणि या साहित्य प्रवासाला गतिशीलता प्राप्त झाली. त्या काळात हा शब्द जाती संज्ञा म्हणून वापरला गेला नव्हता. दलित ही जात म्हणून नव्हे तर जाणीव म्हणून वापरली गेली होती. मी मागेही असे म्हटले होते की, जो व्यवस्थेचा बळी आहे आणि सर्वदृष्टय़ा जो वंचित आहे, तो दलित आणि त्याने लिहिलेले ते दलित साहित्य. एखादी व्यक्ती जन्माने दलित नसेलही, पण त्याच्या साहित्यात वंचितांच्या, उपेक्षितांच्या भावना निष्ठापूर्वक प्रतिबिंबित झाल्या असतील तर त्याला दलित साहित्यच म्हटले पाहिजे अशी भूमिका 80 च्या दशकात मी घेतली होती. हे पाहू जाता लेखक कोणत्याही जातीत जन्माला आलेला असेल, त्याने तात्त्विक भूमिकेचा पोक्तपणा हा सृजनास किती सामर्थ्याने मांडला हा भाग महत्त्वाचा. यादृष्टीने दलित साहित्याकडे पाहण्याची दृष्टी विकसित होत होती. ग्रामीण साहित्यानेही उपेक्षा आणि शोषणाच्या भूमिका मांडलेल्या आहेत. दलित साहित्य वगळता अन्य वाङ्मयीन प्रवाहांना त्यांचे वाङ्मयीन तत्त्वज्ञान विकसित करता आले नाही. ग्रामीण साहित्य म. फुलेंच्या तत्त्वज्ञानास आपली प्रेरक शक्ती मानते, पण तत्त्वज्ञानातील कोणत्या घटकांना वाङ्मयीन मूल्य मांडलं गेलं, त्याचे तपशील आविष्कृत करता आले नाहीत.

दलित वाङ्मयाने त्यांचे वाङ्मयीन तत्त्वज्ञान मांडले असले तरी ते पुरेसे नाही. म्हणून दलित साहित्याचे मूल्यमापन करताना केवळ आस्वादक समीक्षेवरच समाधान मानावे लागते. म्हणून या वाङ्मयीन तत्त्वज्ञानाचे जोपर्यंत वाङ्मयीन घटक-उपघटक निश्चित होत नाहीत, तोपर्यंत या वाङ्मयीन चळवळीच्या तत्त्वज्ञानाचे सौंदर्यशास्त्र्ाही विकसित होणार नाही आणि त्याच्या मूल्यमापनाच्या कसोटय़ा निश्चित करता येणार नाहीत.

भाई तुम्ही कुठे आहात?’ या गाजलेल्या साहित्य नाटय़कृतीविषयी सांगा….

 एकूणच परिवर्तनवादी चळवळीत धुरीण आपली विचारांची बांधिलकी सोडत नाहीत आणि निष्ठाही विसरत नाहीत. तो फक्त टॅक बदलतो. अशावेळी श्रद्धा ठेवून त्या धुरिणांच्या पाठीमागे धावणाऱया कार्यकर्त्यांचं नेमकं काय होतं असा आशय असलेले हे नाटक आहे. चळवळीला आयुष्य अर्पण करून आयुष्य वाऱयावर सोडणारे कार्यकर्ते मी अनुभवले आहेत. दुसरे असे की, एखादे तत्त्वज्ञान केंद्रावर ठेवून समाजकार्य समाजातल्या स्त्री सन्मानासाठी झिजते, संघर्ष करते असे आपण अनुभवतो. दलित आत्मकथनकारांनी त्यांची लेकबाळ चौथऱयावर आणून बसवली आणि तिची मानखंडणा केली याची विलक्षण अशी बोचणी मला होती. तिच्या सन्मानासाठी स्वाभिमानी कार्यकर्ती चित्रण करणारा नाटय़ांश मी लिहिला.

आजपर्यंत आपण विविध संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले. आता मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचाही सन्मान मिळाला, त्याविषयी…

अनेक साहित्य संमेलनांचा अध्यक्ष राहिलो, त्या-त्या साहित्य संमेलनांची एक प्रकृती होती. मसापच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला, आनंद आहे. आजपावेतो वाङ्मयीन क्षेत्रात मी केलेल्या कामाची ती पावती आहे.