मातीतले खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळ तोरसकर,[email protected]

चेंडूचा खेळ तसा ऐकायला सोपा… पण खेळायला तेवढाच तंत्रशुद्धच आणि थकवणारा…

गेल्या वेळी आपण हॅण्डबॉलचा इतिहास पाहिला. आता या खेळाबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया. हा खेळ खेळण्यासाठी आपणास  उच्च दर्जाचे तांत्रिक प्राप्त करावे लागेल. यशस्वी खेळाडूला नेहमीच त्याची शारीरिक तंदुरुस्ती उच्च दर्जाची ठेवावी लागेल. तरबेज खेळाडूला नेहमीच या खेळातील खाचा खोचा माहीत असणे व उत्तम डावपेचांचे ज्ञान असावे लागते. त्याचबरोबर खेळाडूला योग्य मानसिक दृष्टिकोन व खिलाडूवृत्तीची उत्तम जाण असणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर या खेळातील मूलभूत कौशल्यांचा विचार केला तर मात्र अवघी सात कौशल्य नीट व बारकाईने त्यावर अभ्यास केला तर मात्र आपण या खेळातील एक उत्कृष्ट खेळाडू होऊ शकू. ती सात कौशल्य पुढीलप्रमाणे आहेत. धावणे, उडी मारणे, झेलणे, फेकणे, अडविणे व चेंडूवर ताबा मिळवणे, चेंडूला टप्पे देणे व शेवटचे म्हणजे योग्य शारीरिक हालचाली.

जर सांघिक खेळांचा विचार केला तर बर्फावरील हॉकी खेळानंतर हॅण्डबॉल हा खेळ अतिशय वेगवान असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या खेळातील मुख्य भर असतो तो म्हणजे वेगावर. त्यासाठी या खेळात धावणे या प्रकारावर अतिशय भर दिला जातो. आक्रमण करणे अथवा बचाव करताना खेळाडूला नेहमीच धावावे लागते. खेळाडूला चेंडू पास करताना, ड्रिबल करताना सतत मैदानावर धावपळ करावी लागते. बचाव करताना अथवा आक्रमण करताना खेळाडूला नेहमीच योग्य दिशेने व नियोजनाप्रमाणे पुढे-मागे, बाजूला किंवा दिशा बदलून धावावे लागते व संघासाठी गोल करावा लागतो. हे सर्व करत असताना आपल्याला योग्य प्रकारे उडीसुद्धा मारावी लागते. उडय़ा तर आपण आपल्या जीवनात नेहमीच मारत असतो. मात्र ही उडी तंत्रशुद्ध असावी लागते. खेळाडूला चेंडू पास करताना उंच उडी मारून चेंडू आपल्या सहकाऱयाकडे पास करतो. याविरुद्ध प्रतिस्पर्धी खेळाडूने पास केलेला चेंडू हवेत उडी मारून त्यावर ताबा मिळवणे. त्यासाठी खेळाडूच्या पायात प्रचंड ताकद असणे अतिशय महत्त्वाचे आहे. सूर मारून चेंडू अडवणे यासाठीसुद्धा एका वेगळ्या प्रकारची उडी अपेक्षित असते.

हॅण्डबॉल खेळताना चेंडू फेकणे हे एक अतिशय सुंदर कौशल्य आहे असे लक्षात येईल. चेंडू फेकताना खेळाडू नेहमीच अतिशय वेगाने व अचूक दिशेला फेकत असतो. खरंतर हे कौशल्य म्हणजे शूटिंगचे कौशल्य होय. यासाठी खेळाडूला अचूकतेवर भर देताना तंत्र व योग्य वेळ यांची सांगड घालावी लागते. हॅण्डबॉलमध्ये पासिंग करताना शोल्डर पास, पुश पास, बाऊन्स पास तर शूटिंग करताना जंप शूट, साइड शूट, डाईव्ह शूट, पेनल्टी शूट यासारख्या प्रकारांवर चेंडू फेकताना भर दिला जातो. जसं चेंडू फेकण्याला या खेळात महत्त्व आहे तसेच चेंडू झेलण्यातसुद्धा एक वेगळीच चलाखी अंगी बाणावी लागते. चेंडूवर वैयक्तिक नियंत्रणासाठी ठेवण्यासाठी चेंडू उत्तमरीत्या झेलावा लागतो. पास केलेला चेंडू आपल्या संघाच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी, शूटिंग व ड्रिबलिंग करताना चेंडूवर गतियुक्त नियंत्रण मिळवण्यासाठी व योग्य हालचाली करण्यासाठी चेंडू झेलणे हे एक उत्कृष्ट कौशल्य आहे.

चेंडू अडविणे व चेंडूवर ताबा मिळवणे हे या खेळातील मुख्य अस्त्र आहे. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू गोल करण्यासाठी मैदानावर जिवाचे रान करत असतात. त्याचवेळी विरुद्ध संघातील खेळाडू त्या चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी / योग्य रीतीने चेंडू अडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. शूट केलेला चेंडू अडवणे व आपल्या संघाच्या ताब्यात घेत विरुद्ध दिशेला आक्रमण करणे हे महत्त्वाचे कार्य हे खेळाडू मैदानावर करताना दिसतात. त्याचबरोबर चेंडूला टप्पा देणे हे एक वेगळेच कौशल्य प्रत्येक खेळाडूला जपावे लागते. चेंडूला पुढे-मागे करणे, बाजूला घेऊन जाणे इत्यादीसाठी चेंडूला टप्पा देणे व त्याला दिशा देणे हे ज्याला योग्य वेळी व योग्य क्षणाला जमते तो खेळाडू त्या सामन्यावर वर्चस्व निर्माण करू शकतो. यासाठी प्रत्येक खेळाडूला आपल्या शारीरिक हालचाली योग्य रीतीने नियंत्रित करणे फारच महत्त्वाचे आहे. योग्य वेळी फिरणे, योग्य वेळी वळणे, हूल देणे आदी गोष्टींवर भर दिल्यास सामन्यावर पकड निर्माण करण्यास खेळाडूला वेळ लागत नाही. योग्य शारीरिक हालचाली केल्याने चेंडू पास करणे, पकडणे, शूटिंग करणे ही मूलभूत कौशल्यं चांगल्याप्रकारे विकसित होऊन चांगला खेळाडू घडण्यास मदत होते.

हे सर्व जर आपण नियमितपणे व योग्य मार्गदर्शनाखाली करू लागलो तर मात्र आपल्यातील हॅण्डबॉल खेळाडूला कोणीच रोखू शकणार नाही. त्यासाठी आपल्या पायांची (फूट पोझिशन) जागा म्हणजेच एक पाय पुढे व एक पाय मागे, दोन पायांतील अंतर याचा नियमित सराव असणे महत्त्वाचे. नेहमीच आक्रमणाची किंवा बचावाची तयारी असणे व त्याप्रमाणे ‘फूट पोझिशन’ असणे या खेळात अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचवेळी शरीराचे वजन आपल्या चवडय़ांवर येईल, दाब घोटा व टाचेवर जाईल याचीही काळजी घ्यावी लागते. त्याचवेळी आपले हात कोपरात वाकलेले व शरीराजवळ असावे त्यामुळे पुढचा पवित्रा घेणे खेळाडूला सहज शक्य होते. डोकं शांत ठेवून विचारांना चालना दिल्यास आपण हमखास यशस्वी हॅण्डबॉल खेळाडू होऊ शकतो. जर आपण व्यावसायिक हॅण्डबॉल खेळाडू होऊ शकलो नाही तरी आपण हा खेळ खेळल्याने आपल्या शरीराला वरील व्यायाम तर मिळतीलच त्याशिवाय आपले शरीर नेहमीच आपल्या नियंत्रणात राहून तंदुरुस्त राहू व आपले शरीर वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहील.