केडगाव दुहेरी हत्याकांड; आरोपी पप्पू मोकळे, बाबासाहेब केदार यांचे जामीन अर्ज फेटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

केडगांव दुहेरी हत्याकांडातील आरोपी पप्पू मोकळे व बाबासाहेब केदार यांचे जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले. एप्रिल 2018 मधे केडगांव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी पप्पू मोकळे व बाबासाहेब केदार यांनी नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. या जामीन अर्जाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश  के. के. पाटील यांच्यासमोर झाली.

या गुन्ह्याशी आपल्या अशीलांचा संबंध नसून खोट्या गुन्ह्यात राजकीय हस्तक्षेपामुळे विनाकारण अडकविल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. त्याला सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभिवक्ता केदार केसकर यांनी तीव्र हरकत घेऊन आरोपींचा गुन्ह्याशी संबंध असल्याची कागदपत्रे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य, कागदोपत्री पुरावा व आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेवून न्यायालयाने आरोपी मोकळे व केदार यांचा जामीन अर्ज फेटाळला.