
सामना प्रतिनिधी । सटाणा
शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा व आरम नदीपात्र कोरडेठाक पडल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. त्यामुळे शहराला दहा दिवासांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष मोरे यांचे अध्यक्षतेखाली शहराच्या पाणी टंचाई बाबत नगरसेवक, अधिकारी यांच्यी बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष मोरे म्हणाले की, 19 आक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे सालाबादाप्रमाणे सोडण्यात येणारे आवर्तन उशिरा सोडण्यात येणार आहे. तसेच गिरणा व आराम नदीपात्रसुद्धा कोरडे झाल्याने नगर परिषदेच्या असलेल्या विहिरींची पाण्याच्या पातळीने तळ गाठलेले आहेत. त्यामुळे विहिरीतील उपलब्ध पाण्यानुसार दहा दिवासांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असून पाणीटंचाई उपाययोजना अंतर्गत कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये ठेगोंडा, दर्गा विहीर, अमरधाम विहीर, मळगांव बंधारा या शहराला पाणी पुरवठा करणाऱया विहिरींची खोली शंभर फुटांपर्यंत वाढविणे व आडवे बोअर करणे, शहरातील व शहरालगतच्या विहीरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करून शहरास पाणी पुरवठा करणे, टंचाई कालावधीत हातपंप तात्काळ दुरुस्ती करणे, शहरात आवश्यक गरजेनुसार 15 इंधन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील 18 व दत्तक योजनेअंतर्गत 16 विंधन विहिरींद्वारे नागरीकांना पाणीपुरवठा सुरू असून सदर जलपऱ्यांचा पाण्याचा दुरूपयोग करताना आढळल्यास जलपरी नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला.
बैठकीस उपनराध्यक्ष संगाता देवरे, पाणी पुरवठा सभापती राहुल पाटील, नगरसेवक काकाजी सोनवणे, सोनाली बैताडे, पाणीपुरवठा अभियंता राकेश पावरा, संजय सोनवणे, आनंदा सोनवणे, मनोहर बोरसे आदी उपस्थित होते.






























































