
सामना प्रतिनिधी, ठाणे
स्वतःचे वाहन कंपनीला अथवा इतरांना हफ्ते भरून भाडय़ाने देणाऱया सर्वसामान्यांसाठी धोक्याची घंटा असून या पद्धतीने तुमचे वाहन थेट परराज्यात विकणारी टोळी सध्या सक्रीय आहे. वागळे इस्टेट पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून आरोपी अशपाक सिद्धिकी ऊर्फ समीर याला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 22 लाख 72 हजार रुपये किमतीच्या विविध गाडय़ा हस्तगत केल्या असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
चारचाकी गाडय़ा भाडे तत्त्वावर देताना जास्त भाडे मिळवण्याच्या आमिषाने पुरेपूर खात्री सर्वसामान्यांकडून केली जात नाही. याचा गैरफायदा घेत आरोपी अशपाक याने मुंब्रा, मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहने अधिक भाडे देऊन अनेकांकडून ताब्यात घेतली. हीच वाहने त्याने परराज्यात विकली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. टी. पवार यांच्या पथकाने अशपाक याला अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला.
summary- car thief gang was active in thane































































