
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेनेच्या दणक्याने राज्य सरकार ताळय़ावर आले असून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याची घोषणा केली असून यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवला, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर तसेच धुळे जिल्ह्य़ातील धुळे, शिरपूर, सिंदखेडे या तालुक्यांचा समावेश आहे. लवकरच केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येईल आणि पाहणीनंतरच दुष्काळ जाहीर होऊन केंद्राची मदत मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. आजही शिवसेनेने रुद्रावतार धारण केला. शिवसेना पक्षप्रमुख यांनी राज्यात दुष्काळी स्थिती असून केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, असे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात बजावले होते. आज अखेर मुख्यमंत्र्यांनी 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याची कबुली दिली आणि राज्याने आतापासूनच मदतीला सुरुवात केल्याचे सांगितले.
केंद्राची मदत येण्याआधी शेतकऱ्यांना मदत द्या
शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. शेतकऱ्यासाठी चारा छावण्या उभारू नका. त्यापेक्षा शेतकऱ्यांना चाऱ्याचे पैसे द्या, त्या पैशातून ते चारा विकत घेतील. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी गुरांसाठी चारा लावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत द्या, कर्जफेडीसाठी त्यांच्यामागे तगादा लावू नका, अशी मागणी केल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत जाहीर होईल तेव्हा होईल, पण त्याआधी शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपये आगाऊ रक्कम द्या, अशी मागणी करण्यात आल्याचे रावते म्हणाले.
दुष्काळसदृश तालुक्यांची यादी
नगर जिल्हा: जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा.
अकोला: अकोला, बालापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा.
अमरावती: अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, मोर्शी, वरुड.
संभाजीनगर: संभाजीनगर, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर.
बीड जिल्हा: अंबेजोगाई, आष्टी, बीड, धरूर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पातोडा, शिरुर (कासार), वाडवणी.
धुळे जिल्हा: धुळे, शिरपूर, सिंदखेडे.
नाशिक जिल्हा: बागलाण, चांदवड, देवला, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर.
धाराशीव जिल्हा: लोहारा, कळंब, धाराशीव, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम.
पालघर जिल्हा: पालघर, तलासरी, विक्रमगड.
परभणी जिल्हा: मनवत, पालम, परभणी, पाथरी, सेलू, सोनपेठ.
पुणे जिल्हा: आंबेगाव (घोडेगाव), बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी पौड, पुरंदर सासवड, शिरूर घोडनदी, वेल्हे.
कर्जवसुलीला स्थगिती
कर्जवसुलीस स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेकडून मागील बैठकीत करण्यात आली होती. त्यानुसार दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, पृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5 टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, ‘रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.





























































