
>> क्षितीज झारापकर
‘इव्होल्युशन-अ क्वेश्चन मार्क’ आणि ‘दिग्दर्शक’. दोन आंतरमहाविद्यालयीन एकांकिका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून अनेक चांगले प्रयोग आणि विषय मराठी रंगभूमीला मिळत असतात.
सध्या मराठी रंगभूमी ही एका खूप महत्त्वाच्या परिवर्तन काळातून जात आहे. कोणत्याही कलाक्षेत्राला नवीन टॅलेन्टची नितांत गरज असते. टॅलेन्टच्या नावीन्यातूनच ती कला वृद्धिंगत होत असते. रंगभूमी आणि नाटय़क्षेत्राला ही गरज अधिक तीव्रतेने भासते. कारण इथे एक्सपोझरचा एक भाग असतो. कलाकार लोकप्रिय झाले की मग त्यांनाच घेऊन सादरीकरण करण्याची चढाओढ सुरु होते. याचा परिणाम म्हणजे ते कलाकार अतीपरीचित होऊ लागतात आणि त्यांच्यातला प्रेक्षकांचा इंटरेस्ट कमी होतो. हे अभिनय, लेखन, दिग्दर्शन या सगळ्याच्या बाबतीत होतं. पण काही वेळेला या पलिकडेही परीवर्तन घडत असतं. मराठी नाटय़सृष्टीत सध्या असं विविध पातळ्यांवर बदल घडतोय. नाटकं भव्य आणि मोठी होऊ पाहताहेत. निर्माते नेहमीचा विनोदी फॉर्म्युला सोडून अनेक वेगवेगळे विषय करायला धजावताहेत. नाटकाच्या तिकिटाच्या किंमतीही वाढू पाहताहेत. या सगळ्या संक्रमणातून आपली लाडकी मराठी रंगभूमी अधिक समृद्ध होणार आहे. या सगळ्या बाबी एकमेकांशी जुडलेल्या आहेत. भव्य नाटकं सादर करायला खर्चही अधिक असतो. मग तिकिट वाढवणं आलं. वेगळे विषय हाताळायचे तर त्यात रंगकर्मी अधिक कुशल हवेत आणि कुशलतेला अधिक मोल द्यावं लागतं. पण मग याचा अर्थ आपल्याला प्रेक्षक म्हणून नाटकातही महागाईला सामोरं जावं लागणार का? तर अगदी तसंच काही नाही. मराठी रंगभूमीवर अनेक असे उपक्रम सतत सुरू असतात, जे नेहमीच प्रेक्षकांकरिता खुले असतात. मात्र प्रेक्षकांनीसुद्धा खुल्या मनाने या उपक्रमांचा वेध घ्यायला हवा.
विविध स्तरांवरच्या एकांकिका स्पर्धा किंवा महोत्सव, अनेक संस्थांमार्फत होणारे नाटय़महोत्सव पु. ल. देशपांडे मिनी थियेटर, प्रबोधनकार ठाकरे मिनी थियेटर, साठे महाविद्यालय रंगमंच, पुण्यातला सुदर्शन कलामंच अशा अनवट ठिकाणी प्रेक्षकांना नाटय़कलेचा पूरेपूर आस्वाद खिशाला जड न जाता घेता येतो. या ठिकाणांमधूनच मराठी रंगभूमीला नवीन टॅलेन्टही मिळतो. व्यावसायिक निर्माते एकांकिकांमधून पूर्ण नाटक शोधू लागलेत आणि हा नवीन टॅलेन्ट त्यांना उत्तम प्रतिसाद देतोय. याची दोन मुख्य उदाहरणं म्हणजे ‘अनन्या’ आणि ‘देवबाभळी’. म्हणूनच आज आपण इथे दोन स्तरांवरच्या दोन एकांकिकांचं परीक्षण करणार आहोत.
एकूणच अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेचा हा विनामूल्य उपक्रम प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच आहे. असे अनेक नाटय़उपक्रम महाराष्ट्राच्या विविध शहरातून सतत होत असतात. प्रेक्षकांनी जागृतपणे जर शोधलं तर नाटय़कलेचा आस्वाद घेणं ही बाब फार खर्चिक नाही. मग मोठी व्यावसायिक नाटकं त्यांच्या आंतरिक खर्चामुळे वाढीव तिकीट दराने होतात हेही खटकणार नाही.
‘इव्होल्युशन – अ क्वेश्चन मार्क’
आंतरमहाविद्यालयीन एकांकीका स्पर्धांच्या जवळपास सगळ्या मंचांवर या वर्षी गाजलेली एकांकीका म्हणजे ‘इव्होल्युशन – अ क्वेश्चन मार्क’. किर्ती महाविद्यालयाची ही एकांकीका मराठी नाटकाच्या विषयांमधल्या संक्रमणाचं एक प्रतिक आहे. बंगालच्या उपसागरात विशाखपट्टणमपासून काही अंतरावर एक द्वीप आहे, जे ‘सेन्टीनल आयर्लण्ड’ या नावाने ओळखतात. तिथले अदिवासी हे प्रचंड आक्रमक पद्धतीने कोणत्याही आधुनिकतेचा प्रतिकार पूर्वापार करीत आलेले आहेत. तिथे आपल्या आधुनिक जगातून कुणी पोहोचलंच तर ती व्यक्ती जिवंत ठेवली जात नाही. हिंदुस्थानी नौसेना तिथे पाऊल न ठेवता या द्वीपाचं संरक्षण करते. अशा द्विपावरची जवळजवळ शब्दहीन संहिता घेऊन ‘इव्होल्युशन – अ क्वेश्चन मार्क’ बेतलं गेलंय. एक डॉक्टरीण आपल्या नवविवाहीत नवऱयासोबत मधुचंद्रासाठी गेली असता तिथे पोहोचते. नवऱयाला मारलं जातं आणि मग तिची तिथल्या अदिवासींच्या सोबतच्या इंटरॅक्शनची ही कहाणी. चाळीस कलाकारांच्या संचात लेखक-दिग्दर्शक शुभांक राऊळने हे नाटय़ खूप परिणामकारक पद्धतीने उभं केलंय. अनिकेत विचारे याने नेपथ्य आणि संगीत उत्तम दिलंय. प्रियांका खरुडे आणि विजय सानप यांनी वेशभूषा खूपच रियलिस्टीक केली आहे. ‘इव्होल्युशन – अ क्वेश्चन मार्क’मध्ये उठून दिसतात त्या कीर्ती महाविद्यालयाच्या तरुण आणि अत्यंत प्रतिभावान रंगकर्मी किरण राजपूत आणि सायली आदीवासी स्त्राr कोराओ इतकी स्वाभाविक साकरली आहे की ती खरोखर सेन्टीनेलवरची वाटावी. किरण राजपूत आता व्यावसायिक रंगभूमीवर आली आहे. ‘ऑल द बेस्ट–2’ आणि ‘आबालाल अडकित्ते अणि मुमताज महल’ या दोन नाटकांतून ती दिसली आहे आणि लवकरच तिचं ‘आलिशान’ हे मेगा नाटक येतंय. मराठी रंगभूमीला नवीन टॅलेन्ट मिळतो तो असा. ‘इव्होल्युशन – अ क्वेश्चन मार्क’मध्ये आणखीन दोन कलाकार भावतात. माशुए झालेला सिद्धांत बेलवलकर आणि म्हातारी – रुची गायकवाड. एकंदरीत ‘इव्होल्युशन – अ क्वेश्चन मार्क’ हे नवीन जोमाचं मराठी नाटक खूपच इंटरेस्टींग आणि एन्टरटेनिंग आहे.
‘दिग्दर्शक’
दुसरी एकांकिका नाटय़परिषदेच्या शाखांतर्गत स्पर्धेत नागपूर महानगर शाखेने सादर केलेली ‘दिग्दर्शक’. नाटक, नाटकाची परिभाषा आणि रंगकर्मींची नाटय़कलेशी हवी असलेली बांधिलकी यावर प्रखर भाष्य करणारी ही संहिता. लेखक शफी नायकवडी यांच्या नाटय़क्षेत्राविषयीच्या विष्लेशणात्मक संवादांना टाळय़ा घेत ही एकांकिका पुढे सरकत जाते. द्वीपात्री सादरीकरण दिग्दर्शनातून अत्यंत परिणामकारक करण्यात दिग्दर्शिका नलिनी बनसोड यशस्वी झालेल्या आहेत. द्वीपात्री असल्याने मग ‘दिग्दर्शक’मधल्या दोन कलाकारांवर खूप भिस्त आहे. सलीम शेख यांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत मजा केलेली आहे. क्षणार्धात देहबोली आणि लहेजा बदलून वेगळा काळ दाखवण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगं आहे. पूजा पिंपळकर यांनी नटी आणि दिग्दर्शकाची मुलगी सानिका ही दोन वेगळी पात्रं कमालीच्या सहजतेने उभी केली आहेत. पेहराव आणि रंगछटा न बदलता हे करणं खरंच कौतुकास्पद आहे. ‘दिग्दर्शक’ ही एकांकिका अशा तऱहेने ठाशीवपणे आपलं म्हणणं मांडून जाते आणि पाहताना प्रेक्षकांना आनंद देऊन जाते.
नाटक – इव्होल्युशन -अ क्वेश्चनमार्क
लेखक, दिग्दर्शक – शुभंकर राऊळ
नेपथ्य, संगीत – अनिकेत विचारे
वेशभुषा – प्रियांका खारूडे, विजय सालप
कलाकार – मीरा राजाध्यक्ष, सायली जोशी, रुची गायकवाड, रोहित तेजी, सिद्धांत बेलवणकर, किरण राजपुत आणि चाळीस कलाकार
दर्जा – तीन स्टार
नाटक – दिग्दर्शक
निर्माते – नागपूर महानगर शाखा, अ. भा. मराठी नाटय़परिषद
लेखक – शफी नायकनवडी
दिग्दर्शिका – नलिनी बनसोड
कलाकार – पूजा पिंपळकर, सलीम शेख
दर्जा – अडीच स्टार

























































