
सामना प्रतिनिधी । जामखेड
जामखेड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आसतानाही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातून राजरोसपणे पाण्याचा उपसा सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने धडक कारवाई करत विद्युत मोटारी जप्त करण्याची कारवाई केली आहे.
अनेक वेळा सांगूनही न ऐकता भूतवडा तलावातून अनाधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांना विद्युत मोटारी जप्त करत तहसीलदारांनी चांगलाच झटका दिला आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावात अवघे ३० दशलक्ष घनफूट इतकेच पाणी शिल्लक आहे. त्यातही वापराजोगे फक्त १५ दशलक्ष घनफूट पाणी उपयोगी आहे. शहराला सध्या सहा दिवसांतून एकदा एक तास पाणी मिळत आहे. शहराला मोठ्या पाणी टंचाई संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत तलावातून अनाधिकृतपणे विद्युत मोटारीने शेतीसाठी पाणी उपसा चालूच आहे. अनेकवेळा प्रशासनाने सांगूनही पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांनी जप्त केल्या
यापूर्वी गेल्या महिन्यात दि २१ सप्टेंबर रोजी भूतवडा तलावाची पथकाने पहाणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या पथकाने १० स्टार्टर जप्त केले. काही विद्युत मोटारींचे डायरेक्ट डिपीतूनच कनेक्शन असल्याचे आढळले ते कनेक्शन पथकाने तोडले. अनेकवेळा नगरपरिषद प्रशासनाने अवैद्यरित्या पाणी उपसा करणाऱ्यांना तंबी दिली मात्र कोणीही ऐकत नसल्याने यावेळी तलाव परिसरात सिंगल फेज लाईन केली होती . यानंतरही कोणी पाणी उपसा करतांना आढळून आले तर त्यांच्यावर गून्हा सरळ दाखल केला जाईल, असे मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांनी सांगितले होते. तरीही सदर मोटारी चालूच होत्या.































































