
सामना प्रतिनिधी। कर्जत
जनावरांची तस्करी करणारा टेम्पो अडवल्याने नेरळमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी कर्जत येथून नेरळकडे पाच जनावरांची तस्करी करणारी पीक अप गाडी जात असल्याची माहिती नेरळ गावातील तरुणांना मिळाली होती. सकाळी साडे सहा वाजता सदर गाडी माणगाव येथील पेट्रोल पंपावर केवल दहिवलीकर,प्रज्ञेश खेडकर,श्याम कडव,ओंकार भडसावळे आणि श्रीहरी काळे या तरुणांनी अडवली. एमएच 46 ई-904 या क्रमांकाची पीक अप गाडी घेऊन हे दोन्ही तरुण नेरळ पोलीस ठाणे येथे निघाले. मात्र नेरळ पोलीस ठाणे समोर आल्याचे लक्षात येताच पीक अप चालकाने अतिशय वेगाने गाडी काढून कल्याणकडे पळविली. त्यावेळी श्रीहरी काळे आणि केवल दहिवलीकर यांनी त्या जनावरे भरलेल्या गाडीचा पाठलाग केला,पिकअप गाडी नेरळ विद्या मंदिर शाळेजवळ अडविली.मात्र तेथे गाडी चालकाने या दोन्ही तरुणांना शिवीगाळ करीत केवल दहिवलीकर यास मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यामुळे जखमी अवस्थेत असलेल्या केवल दहिवलीकर यास वाचविण्याचे प्रयत्नात पीक अप चालक गाडी घेऊन पसार झाले.
या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून दोन अनोळखी इसम आणि पीक अप गाडी यांच्यावर तसेच गंभीर दुखापत केल्याबद्दल भादवी कलम 323,504,506, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेरळ पोलीस फरार गाडी आणि त्यात असलेली पाच जनावरे तसेच दोन अनोळखी इसम यांचा शोध घेत आहेत अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली आहे.































































