
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
अण्णासाहेब आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मागणीसाठी आजवर 20 हजार मराठा तरूणांनी अर्ज केले असून केवळ 800 तरुणांना कर्ज मिळाले आहे. राष्ट्रीयकृत बँकांमधील अमराठी अधिकाऱ्यांमुळे कर्ज वाटपास विलंब होत असल्याची खंत महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. जास्तीत जास्त तरूणांना कर्ज मिळावे यासाठी प्रयन्तशील असून बँकांमधील अधिकारी बदलण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील संत तनपुरे महाराज मठात अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून कर्जाची प्रक्रीया तसेच माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण उपस्थित होते.
पाटील म्हणाले, काही महिन्यापूर्वीच मी या महामंडळाचा पदभार घेतला असून त्यावेळी केवळ 350 जणांनाच कर्ज मिळाले होते. पदभार घेतल्यापासून दोन महिन्यात ही संख्या दुप्पट वाढवली आहे. बेरोजगार तरूणांना उद्योगासाठी, शेतीसाठी तीन वेगवेगळ्या टप्यात 1 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज वाटप केले केले जात आहे. राष्ट्रीयकृत बँकांमधील अमराठी अधिकार्यांमुळे कर्जाचे वाटप करण्यात विलंब होत आहे. राष्ट्रीयकृत बँकांना मुख्यमंत्र्यांनी हमीपत्र दिले आहे तरीही अधिकारी कर्ज वाटपास टाळाटाळ करताना दिसतात. यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व बँक अधिकार्यां समवेत बैठक घेऊन सदर कर्ज प्रकरणे अधिकाधिक मंजूर करण्याविषयी सूचना देत आहोत. प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत कर्जाच्या माहितीसाठी मराठी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सदर कर्जाची प्रक्रीया सुरूवातीपासूनच ऑनलाईन पध्दतीने असल्यामुळे यामध्ये कोणताही भ्रष्टाचार होत नसल्याचा दावा त्यांनी केला. इतर महामंडळा प्रमाणे यामध्ये कर्ज मंजुरीसाठी कोणाचीही शिफारश किंवा इतर बाबींची पुर्तता करावी लागत नाही. यामुळे राज्यातील हे पहिले विना भ्रष्टाचार कर्जवाटप करणारे महामंडळ आहे. आजवर सुमारे 45 कोटी रूपयाचे कर्ज वाटप असून याचे साडेबारा टक्याने व्याज शासन भरत आहे. मुद्रा अंतर्गत मराठा तरूणांना कर्ज मिळाले तरी याचे व्याज या महामंडळाच्या माध्यमातून फेडले जाणार आहे.

























































