
सामना प्रतिनिधी । नागपूर
अयोध्येत राम मंदिर बांधण्यात यावे याकरीता कायदा करण्यात यावा, अशी मागणी नागपूर येथील दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली होती. मात्र कायदा करण्यासाठी संसदेत आवश्यक दोन तृतीयांश बहुमत नसल्यामुळे त्याबाबत आताच सांगता येणार नाही, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सरसंघचालकांच्या मागणीलाच छेद दिला. पक्ष संघटन व बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी दानवे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्या अंतर्गत नागपुरला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
अयोध्येत राम मंदिर व्हावे या बाजूनेच आम्ही आहोत. पण त्यासाठी न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. कायदा करण्यासाठी आवश्यक बहुमत नसल्यामुळे न्यायालयाचा निकाल काय लागतो हे पाहावे लागेल, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
विदर्भासाठी हवी सहमती
स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही, याबाबत भिन्न मतप्रवाह आहेत. भाजपने स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले असले; तरी कोणताही वाद निर्माण होणार नाही अशी स्थिती येईल; तेव्हाच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती करु, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

































































