
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
प्रवाशांनी खचाखच भरलेले विमान उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच समुद्रात कोसळले. विमानातील सर्व 189 प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होत असून, घटनास्थळावर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी जहाज पाठविण्यात आले आहे.
वैमानिक हिंदुस्थानी
जकार्ताहून उड्डाण केलेले लायन एअर कंपनीचे विमान दिल्लीचे भव्य सुनेजा हे चालवत होते. 2011 पासून ते लायन एअर कंपनीत पायलट म्हणून काम करत होते. सुनेजा यांच्याकडे उड्डाणाचा तब्बल 6 हजार तासांचा अनुभव होता. जकार्ता विमानतळावरून सकाळी 6.20 मिनिटांनी पांगकल पिनांगला जाण्यासाठी ‘लायन एअर’ कंपनीच्या विमानाने उड्डाण केले. विमानावर नजर ठेवणाऱ्या ‘फ्लाईट अवेयर’ या वेबसाईटला काही काळ सिग्नल मिळाले. मात्र, नंतर 13 मिनिटे विमानाचा संपर्क तुटला. विमान सव्वाशे फूट खोल समुद्रात कोसळले. समुद्रात असणाऱया नावाडय़ांनी आकाशातून विमान खाली झेपावताना पाहिले.
इंडोनेशियाच्या आपत्कालीन विभागानेही मदतकार्य सुरू केले असून, विमानाचा मलबा शोधण्यासाठी समुद्र ढवळून काढण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्कालीन विभागाचे प्रमुख मोहमंद स्याउगी यांनी प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पाणबुडय़ांची मदत घेण्यात येत असल्याचे सांगितले. 2014 मध्ये इंडोनेशियात एअर एशिया कंपनीचे विमान कोसळून 162 प्रवासी ठार झाले होते. त्यानंतर झालेला हा मोठा अपघात आहे.
नादुरुस्त विमान उडवल्याचा संशय
समुद्रात कोसळलेले विमान हे नादुरुस्त असल्याचा संशय व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी हे विमान डेनपसार येथून जकार्ताकडे येत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र अभियंत्यांनी तो बिघाड दुरुस्त केला होता असा दावा एअर नेव्हिगेशन अधिकारी सिंदू रहायू यांनी केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, उड्डाणानंतर पायलटने काही मिनिटांतच परतीची परवानगी मागितली होती. तशी परवानगीही देण्यात आली. मात्र त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला असे त्यांनी सांगितले. यावेळी विमान 5 हजार फुटांवरून उडत होते.
summary- plane crashed at indonesia 189 died























































