
सामना प्रतिनिधी । राहाता
राहाता नगरपालिकेच्या स्वनिधीतील पाच टक्के राखीव निधी अपंगासाठी द्यावा अन्यथा २ नोहेंबर पासून प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना व अपंग बांधव राहाता नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील, असा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे राहाता तालुका अध्यक्ष शरद वारुळे यांनी राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राहाता शहरात ४० टक्के व त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांची संख्या ७५ च्या आसपास आहे. अपंगांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून ५ टक्के रक्कम अपंग लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करावीत, असे निर्देश २८ आक्टोंबर २०१५ रोजी शासनाने दिलेले आहे. राहाता नगरपालिकेकडे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करुनही मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी अंपगांच्या विनंतीचा विचार केलेला नाही. गेल्या तीन वर्षांपासून पालिकेच्या अर्थसंकल्पातही या संदर्थात कोणत्याही प्रकारची तरतुद केलेली नसल्याचे माहिती अधिकारात सप्ष्ट झालेले आहे.
अपंगांसाठीचा निधी वाटपासाठी जुलै २०१८ मध्ये नगरपालिकेच्या सभेत ठराव करण्यात आलेला आहे. अपंगसाठीच्या शासन निर्णयाची व संबंधीत सर्व प्रकारचे दस्तऎवज व विनंती अर्ज अपंगांनी पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी सुपुर्द केलेले आहे. मात्र आश्वासनापलिकडे आमच्या पदारात काहीही पडलेले नसल्याची खंत अपंग बांधवांनी व्यक्त केली. येत्या ३१ आक्टोंबर २०१८ पर्यंत अपंगासाठीचा ५ टक्के राखीव निधी अपंगांना वाटप करावा. पालिका कार्यालयात अपंगांना पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी रॅम्प अथवा लिप्टची व्यवस्था करावी किंवा मुख्याधिकारी यांचे कार्यालय व इतर कार्यालये (दप्तर) खालील मजल्यावर आणावेत अन्यथा २ नोहेंबर २०१८ रोजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटननेचे कार्यकर्ते पालिका कार्यालयासमोर अपंग बांधवांसह आपला हक्क मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते,आमदार बच्चू कडू , जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस निक्षक, नगराध्यक्षा यांना देण्यात आलेल्या आहे.






























































