
>>सुनील कुवरे<<
सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या विक्रीला सशर्त परवानगी दिली, पण फटाक्यांवर सरसकट बंदी न घालता फक्त मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली. तसेच फटाके विक्रीच्या अटी-शर्तीमुळे आणि रात्री फक्त 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याचे बंधन घातले गेले. याची अंमलबजावणी पोलिसांनी करावयाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना लोकांचे आरोग्य आणि फटाके निर्मिती व्यवसायात गुंतलेल्या लोकांच्या रोजगाराच्या समस्येशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता देशात कमी आवाजाच्या, कमी प्रदूषण करणाऱ्या ग्रीन फटाक्यांच्या निर्मिती, विक्रीची परवानगी दिली आहे. केंद सरकार हे राज्य सरकारच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत आणि ग्रीन फटाक्यांबाबत जनजागृती करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कोणत्या धर्माविरुद्ध नाही, तर देशात वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी आहे. आवाजाचे फटाके, शोभेचे दारूकाम या दोन्हीमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. ध्वनी आणि वायुप्रदूषणासह यातून बाहेर पडणारा विषारी धूर हा आरोग्यास हानीकारक असतो. देशात दिवसेंदिवस वाढत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. वास्तविक हे काम लोकप्रतिनिधींनी करायला हवे होते, परंतु न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करून निर्णय द्यावे लागत आहेत. फटाके वाजवले की, दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळतो हे स्वाभाविक आहे, पण हजारो लोक जेव्हा दिवाळीच्या चार-पाच दिवसांत सतत फटाके फोडतात तेव्हा जे प्रदूषण होते ते अत्यंत घातक असते. आपल्या देशात चिनी फटाक्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. ते फटाके अत्यंत कमी दर्जाच्या रसायनांचा वापर करून तयार करण्यात आलेले असतात. तो धूर घातक आहे. त्यात वाहनाच्या प्रदूषणाची समस्या आहेच. त्यामुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना जास्त त्रास होतो. श्वसनाचे विकार वाढतात. सर्वसाधारपणे 80 ते 85 डेसिबल ध्वनिप्रदूषणाची पातळी असते. दिवाळीत ती 125 डेसिबलपर्यंत जाते, तर फटाक्यांमुळे पीएम 2.5 ही प्रदूषके मोठय़ा प्रमाणात वाढतात. त्यामुळे मानसिक आजारांसोबत श्वसनाचे विकार निर्माण होतात. जवळपास तीन ते चार हजार कोटींच्या फटाके विक्रीच्या उलाढालीचा विचार केला, तर त्यापेक्षा जास्त खर्च उपचारांवर होतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. दिवाळी सण हा आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे. दिवाळीत फटाके फोडणे म्हणजेच दिवाळी साजरा करणे असे समजण्याचे कारण नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाजाचे फटाके फोडण्यावर बंदी घातली नाही. तसेच कंदील, पणत्यांची, विजेच्या दिव्यांची रोषणाई करणे. दिवाळी ही आनंदासाठी असते तसेच प्रदूषणही महत्त्वाचे आहे. तेव्हा प्रदूषण रोखण्यासाठी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांनी पुढाकार घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक सणाच्या मागे काही परंपरा आहे. त्यांचा योग्य तो आशय समजून घेऊन सण साजरे केले तर हिंदू धर्माचा खरा सन्मान राखला जाईल.






























































