
सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर
श्रीरामपूर पालिकेच्या सभागृहात गुरुवारी चांगलाच गदारोळ झाला. भुयारी गटारीच्या विषयावर पालिकेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांसह विरोधक गदारोळ करताना पाहावयास मिळाले. नगराध्यक्षांनी नगरसेवकांची अक्कल काढल्याने गोंधळाचे वातावरण होते.
गुरुवारी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा संदर्भात विशेष सभा बोलावली होती. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी बाबूराव बिक्कड आदी उपस्थित होते. सुरूवातीपासूनच सभागृहात मूळ विषयावरून आरोप प्रत्यारोप, गोंधळ सुरू झाला. भुयारी गटार योजना ही स्व. जयंत ससाणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यावर मागे काय झाले पुढे काय होणार आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा ही योजना पूर्ण कशी होईल. यावर चर्चा करावी असे नगरसेवक राजेश अलघ यांनी सांगितले. परंतू भुयारी गटार योजनेत पारदर्शकता आली पाहिजे. घाई गडबडीमध्ये मंजुरी का घेतली. आदिक यांनी उपस्थित करताच भारती कांबळे यांनी विशेष सभा बोलावली असल्याने सभेच्या विषयाची माहिती द्यावी. कुणा मध्ये किती पारदर्शकता आहे हे समजलेले आहे. यानंतर गदारोळ सुरू झाला.
पालिकेचे बांधकाम अभियंता गवळी यांनी भुयारी गटार योजनेची माहिती दिली. मूळ योजना 49 कोटी 36 लाखांची असून त्यावर 37 कोटी 94 लाख रूपये आतापर्यंत खर्च झाला आहे. 15 कोटी 80 लाख रूपये अजून शिल्लक आहे. उत्तर भागातील कामे दोन महिन्यात पूर्ण होतील. दक्षिण भागात जागा उपलब्ध नसल्याने एसटीपी प्लँट उभा राहू शकला नाही. दक्षिण भागात किती कामे बाकी आहेत. याची माहिती भारती कांबळे यांनी विचारली. यावर माहिती काढण्याचे काम सुरू आहे, असे उत्तर गवळी यांनी देताच कांबळे आक्रमक झाल्या. माहितीच उपलब्ध नाही तर विशेष सभा कशासाठी बोलावली. अंजूम शेख यांनी पैसे कमविण्यासाठी आधिकारी काम करतात. ठेकेदाराला जावयाप्रमाणे वागणूक देतात. नगरसेवकांमधील भांडणामुळे भुयारी गटार योजना पूर्ण होऊ शकत नाही. याची जबाबदारी नगराध्यक्षांनी घ्यावी, असा टोला त्यांनी लावला.























































