
सामना प्रतिनिधी । पूर्णा
पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथे शुक्रवारी पहाटे पोलीस भरतीच्या तयारीसाठी रोडवर धावणाऱ्या दोन युवकांच्या अंगावरून भरधाव येणारी तवेरा गाडी गेल्याने ते दोघेही जागीच ठार झाले तर सोबतचा अन्य एक जण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातग्रस्त तवेरा गाडी ही धुळे येथून संभाजीनगर मार्गे झिरोफाटा येथून नांदेडला जात असताना पहाटे ४.३० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे माटेगावावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील माटेगाव येथील माटेगाव ते नावकी रोडवर पाच युवक आज पहाटे ४.३० व्यायाम नेहमीप्रमाणे पहाटे पोलीस भरतीच्या तयारीसाठी व्यायामासाठी जात होते. दरम्यान, तवेरा गाडी ( गाडी क्र. एम.एच. ०५ बी.जे. ०११८) धुळे येथून संभाजीनगर मार्गे झिरोफाटा येथून नांदेडला जात होती. या भरधाव गाडीने अक्षरश: तिघांना उडविले. तयारीसाठी आलेल्या पाच जणापैकी एक जण शौचालयास तर एक रोडच्या बाजुला असल्यामुळे ते मात्र बचावले गेले. आजचा दिवस त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरला. या अपघातात गोविंद देवीदास साबळे (२१ रा. माटेगाव), संतोष उर्फ सोनू उत्तम साबळे (१८ रा. माटेगाव) हे दोघे जागीच ठार झाले तर करण रमेश साबळे (१४) हा युवक गंभीर जमखी झाला. या दुर्दैवी घटनेची खबर गावात पसरताच ग्रामस्थांनी धाव घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ व बीट जमादार कवठेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जीप चालक अहेमद खान अलीम खान पठाण (रा.गणीपुरी चौपाला नांदेड)ताब्यात घेतले. ३०४, २२८, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे माटेगाव येथे शोककळा परिसरली असून जखमी करण साबळे याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवसेना सर्कलप्रमुख दशरथ बोबडे यांनी या कामी सहकार्य केले.
































































