निळवंडेसाठी शिर्डी संस्थाकडून ५०० कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहाता

जिरायती भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी संस्थाकडून मिळणाऱ्या ५०० कोटी रूपयांच्या निधीला राज्यपालांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शिर्डी संस्थान आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात होणाऱ्या सामंजस्य करारानंतर हा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी संस्थाने ५०० कोटी रुपयांचा निधी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावा आशी मागणी आपण केलेली होती. या मागणीचा प्रस्ताव शिर्डी संस्थाकडून शासनाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या निधी करिता प्रशासकीय स्तरावर आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्‍यानंतर सदर निधीकरिता माननीय राज्यपालांची मंजूरी मिळावी म्‍हणुन विधी व न्याय विभागाने प्रस्‍ताव त्‍यांच्‍याकडे सादर केला होता असे विरोधी पक्षनेते विखे पाटील म्‍हणाले.

या प्रस्तावाला माननीय राज्यपालांनी काही अटीवर मान्यता दिली असल्याचे सांगतानाच या निधीकरिता शिर्डी संस्थान आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाने विधी व न्याय विभागाचे मार्गदर्शन घेवून सामंजस्य करार करण्यास माननीय राज्यपालांनी सूचित केले असल्याचे विखे पाटील म्हणाले. त्यानुसार राज्यपाल महोदयांनी सूचित केल्याप्रमाणे अटींना अधिन राहून शिर्डी संस्थान यांच्यासोबत निळवंडे कालव्यांसाठी ५०० कोटींचा निधी मिळण्याबाबतचा सामंजस्य करार करण्याची कार्यवाही नियामक मंडळाच्या मान्यतेने महामंडळाच्या स्तरावरून करण्याबाबत शासनाचे उपसचिव सं.रा. तिरमनवार यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांनी लेखी पत्राद्वारे कळविले असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

जिरायती भागातील शेतकऱ्यांना निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या निधी बरोबरच शिर्डी संस्थाकडून निधी मिळावा हा माझा वैयक्तिक प्रयत्न होता. यासाठी शिर्डी संस्थान आणि शासनाकडे पाठपुरावा सुरू होता त्याला यश आले आहे. यासंदर्भात अनेकांनी शंका उपस्थित केल्‍या होत्‍या. परंतू जिरायती भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळवुन देण्‍यासाठी मी कटीबध्‍द आहे. त्‍यादृष्‍टीकोनातून या निधीला मिळालेली मान्‍यता ही मोठी समाधानाची बाब आहे. सामंजस्य करारानंतर लवकर निधी उपलब्ध करून ही कालव्यांची कामे सुरू करण्‍याचा आपला प्रयत्‍न आहे. निधी करिता दिलेल्या मान्यतेबद्दल विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी मा.राज्‍यपालांचे आभार मानले आहेत.