‘सामना’ व ‘मार्मिक’ दिवाळी अंकांचे थाटात प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

‘सामना’ व ‘मार्मिक’ या दिवाळी अंकांचे प्रकाशन आज ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते थाटात पार पडले. याप्रसंगी ‘सामना’चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत, ‘प्रबोधन प्रकाशन’चे विश्वस्त-कोषाध्यक्ष ऍड. लीलाधर डाके, ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, सहसंपादक श्रीकांत आंब्रे, दीपक शिंदे (‘प्रबोधन प्रकाशन’चे नॅशनल हेड रिसर्च ऍण्ड मार्केट डेव्हलपमेंट), प्रमुख वितरक बाजीराव दांगट, पराग दांगट, चारुदत्त दांगट उपस्थित होते.

‘हिंदुत्वाची वज्रमूठ हवी!’ या उद्धव ठाकरे यांच्या जळजळीत संपादकीयासह ‘सामना’ दिवाळी अंकात ‘पडद्यामागचे पडद्यावर’ या अक्षय शेलार यांच्या लेखमालेतील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकर्तृत्वावर आधारित व संजय राऊत निर्मित आगामी ‘ठाकरे’ चित्रपटातील बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱया नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे ‘बायोपिकच्या फ्रेममधून’ या शीर्षकांतर्गत वैशिष्टय़पूर्ण मनोगत, आमीर खान यांचे ‘दंगल’ चित्रपटातील स्वतःच्या भूमिकेवरील भाष्य तसेच सुशांत सिंग राजपूत, कंगना रनोट, सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सोनाली कुलकर्णी यांनी पडद्यावर गाजवलेल्या चरित्रात्मक भूमिकांबद्दल त्यांचे अनुभव हे या अंकाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे.

त्याशिवाय प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचा अभिनयसम्राज्ञी मीना कुमारी यांच्यावरील अप्रतिम लेख तसेच डॉ. महेश केळुसकर यांची मालवणी पत्रापत्री, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या वात्रटिकांमागील त्यांनी सांगितलेले इंगित, दिवाकर शेजवळ यांनी घेतलेला खासदार रामदास आठवले यांच्या चारोळय़ांचा वेध तसेच भारत गणेशपुरे, युवराज शहा, प्रसाद शिरगावकर, मृदुल देसवांडीकर, नीलेश मालवणकर, हेमांगी नेरकर, मोहना जोगळेकर, मिलिंद शिंत्रे, सुरेंद्र पाटील, डॉ. अमित बडवे यांच्या विविधरंगी साहित्याने अंक नटला आहे. कवीकट्टय़ासह नीलिमा प्रधान यांचे वार्षिक राशिभविष्यही आहे.

वाघाचे आकर्षक मुखपृष्ठ छायाचित्र ऋता कळमणकर यांचे आहे. संपादन सहाय्य अरुण निगवेकर, सजावट रवींद्र वरवडेकर यांची आहे. चित्रे यशवंत देशमुख, प्रतिमकुमार कसबेकर, खलिल खान यांची आहेत. ‘मार्मिक’ दिवाळी अंक दरवर्षीप्रमाणे भरपूर विनोदी साहित्याने व राजकीय, सामाजिक व्यंगचित्रांनी सजला आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे ताज्या राजकीय परिस्थितीवरील धमाल मुखपृष्ठ तसेच ज्येष्ठ विनोदी लेखक अनिल नाडकर्णी, विजय कापडी, निरंजन घाटे, अनंत उमरीकर, चंद्रकुमार नलगे, पांडुरंग संगा, जयवंत काकडे, सतीश कदम, श्रीकांत आंब्रे, दिलीप जोशी, निशा सोपारकर, उदय जोशी, कृष्णा कदम यांच्या विनोदी साहित्याने नटला आहे. यशवंत सरदेसाई, प्रभाकर झळके, एस. व्ही. कंदिकटला, महादेव साने, जय जाधव, राजेंद्र सरग, श्रीपाद पालकर, प्रभाकर सिन्नरकर, भरत सावंत, संतोष मोहिते, सुरेश राऊत यांची भरपूर हसवणारी व्यंगचित्रे वाचकांचे मनोरंजन करणारी आहेत. वार्षिक राशिभविष्य होरामार्तंड सोनल नाईक यांचे आहे. संपादन सहाय्य श्याम मोकाशी, ज्योत्स्ना गाडगीळ, रवींद्र आचार्य, मानिनी जेठे, मोहन गांगण यांचे असून कथाचित्रे किशोर गावडे यांची आहेत.

summary- marmik and diwali megazine got published